कोल्हापुरातील ही सात राखीव संवर्धन क्षेत्रे | पुढारी

कोल्हापुरातील ही सात राखीव संवर्धन क्षेत्रे

ठाणे/कोल्हापूर  : पुढारी वृत्तसेवा :  कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा, विशाळगड, चंदगड, गगनबावडा, आजरा, भुदरगड, मसाई पठार या क्षेत्रांचा राखीव संवर्धन क्षेत्रात समावेश करण्यात आला आहे. राज्यात गेल्या अडीच वर्षांत 1 हजार 750 चौरस कि.मी.वर राज्यात नवीन राखीव संवर्धन क्षेत्रे घोषित करण्यात आली आहेत. त्यामध्ये कोल्हापूरमधील या सात क्षेत्रांचा समावेश आहे.

मोठे राखीव वनक्षेत्र अभयारण्य म्हणून घोषित करण्याऐवजी छोट्या आकाराचे संवर्धन क्षेत्र राखीव म्हणून घोषित करणे ही संकल्पना अलीकडच्या काळात रुजली आहे. त्यानुसार ही 23 क्षेत्रे राज्यात राखीव संवर्धन क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आली आहेत. यामुळे गावांचे व लोकांचे पुनर्वसन करावे लागत नाही. त्यामुळे स्थानिकांचा विरोधही होत नाही. संवर्धन राखीव क्षेत्रामध्ये आरक्षित केलेल्या जागांना राखीव वनक्षेत्राच्या संरक्षणापेक्षा उच्च दर्जाचे संरक्षण मिळते. कारण, या जागा जरी वन्यजीव संरक्षण कायद्याने जाहीर झाल्या असल्या, तरी स्थानिकांचे हक्‍क अबाधित राहतात. त्यामुळे राखीव संवर्धन क्षेत्र हा पर्याय अलीकडच्या काळात वाढला आहे.

दरम्यान, पर्यटकांच्या आकर्षणाचा विषय ठरलेल्या ठाणे, नवी मुंबई परिसरात 5 हजार हेक्टर क्षेत्रावर असलेल्या ठाण्याच्या फ्लेमिंगो अभयारण्याला आता जागतिक रामसरचा दर्जा देण्यात आला आहे. याबरोबरच 5 अभयारण्ये नव्याने घोषित करण्यात आली आहेत.
या राखीव संवर्धन क्षेत्रात कोकणातील आंबोली, दोडामार्ग, तिलारी, रायगड, रोहा याबरोबर पश्‍चिम महाराष्ट्रातील जोर जांभळी, मायणी पक्षी संवर्धन केंद्राचा समावेश आहे. नागपूरमधील मुनिया, मोगरकसा, अमरावतीतील महेंद्री, धुळ्यातील चिटबावरी, अलालदरी, नाशिक जिल्ह्यातील कळवण, मुरागड, त्र्यंबकेश्‍वर, इगतपुरी, रायगड जिल्ह्यातील रायगड, रोहा, पुणे जिल्ह्यातील भोर, सातारा जिल्ह्यातील दरे खुर्द यांचा समावेश आहे. यातील तिलारी, जोर जांभळी, आंबोली दोडामार्ग, विशाळगड, पन्हाळगड, मायणी, चंदगड, मुनिया आणि महेंद्री ही 9 राखीव संवर्धन क्षेत्रे अधिसूचित झाली आहेत.

ठाणे खाडी फ्लेमिंगो अभयारण्याचा या क्षेत्रात समावेश आहे. रामसर साईट ही रामसर कन्व्हेन्शनअंतर्गत नियुक्‍त केलेली पाणथळ जमीन आहे. ज्याला कन्व्हेन्शन ऑफ वेटलँडस् असेही म्हणतात. 17 चौरस किलोमीटर आरक्षित जंगल असताना, उर्वरित 48 चौरस किलोमीटर क्षेत्र गतवर्षी ऑक्टोबरमध्ये पर्यावरणाच्या दृष्टीने संवेदनशील क्षेत्र म्हणून अधिसूचित करण्यात आले होते. दरवर्षी सहा महिन्यांसाठी सुमारे 40 हजार फ्लेमिंगोंचे येथे वास्तव्य असते.

‘रामसर’ स्थळे म्हणजे काय ?

ही स्थळे त्या देशाच्या द‍ृष्टीने तसेच संपूर्ण जगासाठी महत्त्वाची स्थळे ठरतात. सध्या जगात 2200 पेक्षा जास्त स्थळांना रामसर स्थळे म्हणून मान्यता देण्यात आली आहे. विविध देश आपापल्या देशातील महत्त्वाच्या पाणथळ जागांचा समावेश या यादीत करत असतात.

पाच अभयारण्ये

शासनाने चंद्रपूर जिल्ह्यातील कन्हारगाव, विस्तारित अंधारी वन्यजीव अभयारण्य, जळगाव जिल्ह्यातील मुक्‍ताई भवानी, गडचिरोली जिल्ह्यातील कोलामार्का, बुलडाणा जिल्ह्यातील विस्तारित लोणार वन्यजीव अभयारण्य अशी पाच अभयारण्ये याच कालावधीत घोषित केली आहेत. यातील कन्हारगाव अभयारण्याची अधिसूचना निघाली असून उर्वरित अभयारण्यांची अधिसूचना निर्गमित करण्याची कार्यवाही सुरू आहे.

Back to top button