कोल्हापूर : कमी कालावधीत जादा परतावा मिळवून देण्याचे आमिष दाखवून मंगळवार पेठ येथील महिलेची 22 लाख 50 हजारांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीला आला. याप्रकरणी संशयित चेतन महेंद्रभाई सुतारिया (रा. ताराबाई पार्क कोल्हापूर, मूळ वडोदरा गुजरात) याच्याविरुद्ध शाहूपुरी पोलिस ठाण्यात रविवारी गुन्हा दाखल झाला आहे.
ऑक्टोबर 2022 ते मार्च 2023 याकाळात फसवणुकीचा प्रकार घडला आहे. पोलिस सूत्राकडून सांगण्यात आले की, सुतारिया यांनी नागाळा पार्कात सेवन ध्रू या नावाने कार्यालय थाटले होते. शेअर मार्केटमधील गुंतवणुकीवर कमी कालावधीत जादा परतावा देण्याचे संशयिताने आमिष दाखविले. गुंतवणूकदारांना आकर्षित करणार्या जाहिरातबाजी केल्याने तेजस्विनी पाटील यांनी जुलै 2022 मध्ये 22 लाख 90 हजार रूपये गुंतविले. प्रांरभीच्या काही काळात त्यांना 40 हजारांचा परतावा मिळाला. ऑक्टोबर 2022 पासून संशयिताने परतावा देण्याचे बंद केले. तक्रारदार तेजस्विनी पाटील यांनी परतावा मिळण्यासाठी वारंवार तगादा लावला; मात्र संशयिताने दाद लागू दिली नाही.
महिलेने शाहूपुरी पोलिस ठाण्यात धाव घेऊन सुतारियाविरुद्ध फसवणूक केल्याची फिर्याद दाखल केली आहे. संशयित सुतारिया याचा शोध घेण्यात येत असल्याचे पोलिस निरीक्षक अजयकुमार सिंदकर यांनी सांगितले. फसगत झालेल्यांनी शाहूपुरी पोलिस ठाण्यांशी संपर्क साधावा, असेही त्यांनी आवाहन केले आहे.