Ambabai Temple | गरुड मंडपाचे माप चुकले... सव्वादोन कोटी पाण्यात गेले

कधी उंची कमी, कधी दर्जा खराब; तीनवेळा बदलले खांब : नुकसानीची जबाबदारी कोण घेणार?
kolhapur |
kolhapur | गरुड मंडपाचे माप चुकले... सव्वादोन कोटी पाण्यात गेले
Published on
Updated on

अनुराधा कदम

कोल्हापूर : चंद्रपुरातून लाकूड आणले, त्याचे खांब तयार झाल्यानंतर दर्जाबाबत शंका आली. पुन्हा खांब तयार करण्याची प्रक्रिया सुरू झाली. केरळवरून लाकूड आणले. खांब तयार केले, पण उभारणी करताना उंचीच कमी पडली. पुन्हा खांब तयार करण्याची सूचना निघाली. परतवाडा येथून लाकूड मागवले, खांबांनी आकार घेतल्यानंतर लक्षात आले की खांबांमध्ये त्रुटी आहेत. नव्याने खांब तयार करण्यात आले... करवीरनिवासिनी अंबाबाई मंदिरातील गरुड मंडपाच्या खांबांचा कधी दर्जा, तर कधी माप चुकले आणि यासाठी सव्वादोन कोटींचे नुकसान झाले. निधी देवस्थानचा, देखरेख पुरातत्त्वची आणि काम ठेकेदाराचे; पण यामध्ये झालेल्या आर्थिक नुकसानीची जबाबदारी कोणाची? हा प्रश्न अनुत्तरीतच राहिला आहे.

गेल्यावर्षी ८ जुलैपासून खांब उभारण्यास सुरुवात झाली. गरुड मंडपासाठी एकूण ४८ खांब लागणार असल्याने त्यासाठी तत्पूर्वी वर्षभरापासून कर्नाटक, तामिळनाडू येथून सागवानी लाकूड आणण्याची प्रक्रिया सुरू झाली होती. टेंबलाई मंदिर परिसरात २२ कारागिरांकरवी लाकूड तासण्यापासून त्यावर कोरीव काम करणे, टिकाऊपणासाठी लीनसाईड ऑईल लावण्याचे काम करण्यात आले. कधी उंची कमी पडली, तर कधी तयार खांबांमध्ये तांत्रिक दोष आढळले. त्यामुळे एकाच कामासाठी तब्बल तीन वेळा खांब तयार करावे लागले.

पाया खोदला, छत वाढले याचा अंदाज कोण घेणार?

गरुड मंडपातील फरशी काढल्याने पाया सहा इंचाने खाली गेला, तर मंडपाच्या मध्यभागी छताची उंची वाढत असल्याने या ठिकाणी लावण्यात येणाऱ्या खांबांची उंचीही वाढवणे गरजेचे होते. मात्र, खांब तयार करताना अशा प्रकारचा पूर्वअभ्यास केल्याचे दिसून न आल्याने सगळाच अंदाज चुकला. खांब तयार केल्यानंतर लक्षात आलेल्या चुकांची किंमत सव्वादोन कोटींच्या नुकसानीवर गेली आहे.

एका खांबासाठी ९ लाख २० हजारांचा खर्च

एका खांबासाठी लाकूड खरेदी, प्रक्रिया, कोरीव काम आणि अंतिम तयार करण्यापर्यंत सरासरी ९ लाख २० हजार रुपयांचा खर्च येतो. या हिशोबाने आठ खांब तीनवेळा बदलले, त्यासाठी सव्वादोन कोटी खर्च आला. गरुड मंडपाच्या पुनर्बांधणीसाठी देवस्थान समितीच्या स्वनिधीतून २२ कोटी ८५ लाख रुपये पुरातत्त्व विभागाला वर्ग केले आहेत. त्यापैकी दहा टक्के खर्च वाया गेला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news