कोल्हापूर : संजय पवारांकडून मुंबईत आमदारांच्या गाठीभेटी | पुढारी

कोल्हापूर : संजय पवारांकडून मुंबईत आमदारांच्या गाठीभेटी

कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा राज्यसभेचे सहावे उमेदवार शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार हे मुंबईतच आहेत. त्यांच्याही आमदारांच्या गाठीभेटी सुरू आहेत. कोल्हापुरातील आमदारांशी महाविकास आघाडीचे जिल्ह्यातील नेते चर्चा करत आहेत. जिल्ह्यातील महाविकास आघाडीचे सर्व आमदार शिवसेनेच्या पवार यांच्या पाठीशी आहेत.

राज्यसभेच्या निवडणुकीसाठी सहावी जागा शिवसेनेला देण्यात आली. माजी खासदार संभाजीराजे यांना शिवसेनेने ऑफर दिली होती. परंतु त्यांनी ती नाकारल्यामुळे उमेदवारीची माळ शिवसेनेचे कट्टर कार्यकर्ते जिल्हाप्रमुख संजय पवार यांच्या गळ्यात पडली. गेल्या तीन दशकांपासून ते शिवसेनेचे काम करत आहेत. उमेदवारी जाहीर झाल्यापासून पवार मुंबईत आहेत. शिवसेना नेते खा. संजय राऊत शिवसंपर्क अभियानाच्या निमित्ताने कोल्हापूर दौर्‍यावर आले होते. त्याच्या तयारीसाठी पवार दोन दिवस कोल्हापूरला आले होते. त्यानंतर ते पुन्हा मुंबईला गेले.

जिल्ह्यात भाजपच्या चिन्हावर निवडून आलेला एकही आमदार नाही. आ. विनय कोरे व आ. प्रकाश आवाडे हे राज्याच्या राजकारणात भाजपसोबत आहेत. उर्वरित आमदार काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रस व शिवसेनेचे आहेत. राज्यसभेचे भाजपचे उमेदवार धनंजय महाडिक व जिल्ह्याचे नेते पालकमंत्री सतेज पाटील यांचे राजकीय वैर संपूर्ण जिल्ह्याला माहीत आहे. त्यामुळे पालकमंत्री पाटील हे महाडिक यांच्या विरोधात जोडण्या करण्यात पुढे आहेत.

भाजपच्याही हालचाली गतिमान

राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी भारतीय जनता पक्षाने आपल्या हालचाली अधिक गतिमान केली आहे. राज्यसभेचे भाजपचे उमेदवार धनंजय महाडिक यांनी राज्यातील आमदारांच्या गाठीभेटींसाठी पायाला भिंगरी लावून फिरत आहेत. आतापर्यंत त्यांनी भाजपच्या पदाधिकार्‍यांसमवेत 25 आमदारांच्या भेटी घेतल्या असल्याचे सांगण्यात आले.

राज्यसभेची निवडणूक अटळ असल्याचे लक्षात आल्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या सूचनांनुसार बैठक घेण्यात आली. 25 जिल्ह्यांतील सर्वपक्षीय आमदारांच्या गाठीभेटींकरिता भाजपचे पदाधिकारी, कोल्हापूर-सांगली-सोलापूर जिल्ह्यांतील नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य, कारखाना संचालक व युवाशक्ती पदाधिकारी यांच्या 25 टीम्स तयार करून आमदारांना भेटण्याचेदेखील नियोजन केले. त्यानुसार हितेंद्र ठाकूर, अबू आझमी, शंकरराव गडाख, प्रहारचे बच्चू कडू, भाकपचे विनोद निकोले यांच्यासह सर्व अपक्ष व बहुतांशी जिल्ह्यांतील आमदारांच्या भेट घेण्यात आल्या आहेत.

जिल्ह्यातील आ. विनय कोरे, आ. राजेश पाटील, आ. प्रकाश आवाडे आदींची महाडिक यांनी भेट घेतली आहे. उर्वरित आमदारांच्याही भेटी ते घेत आहेत. परंतु जिल्ह्यातील त्यांचे कट्टर विरोधक व काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष, पालकमंत्री सतेज पाटील, काँग्रेसचे आ. ऋतुराज पाटील यांच्यासह त्यांच्या गटाच्या आमदारांची महाडिक भेट घेणार काय? याकडे जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे.

Back to top button