कोल्‍हापूर : बालक विक्रीचे मोठे रॅकेट? पाळेमुळे खणून काढण्याचे पोलिसांसमोर आव्हान | पुढारी

कोल्‍हापूर : बालक विक्रीचे मोठे रॅकेट? पाळेमुळे खणून काढण्याचे पोलिसांसमोर आव्हान

इचलकरंजी : बाबासो राजमाने हातकणंगले येथे अडीच वर्षीय बालकाच्या विक्रीचा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्यानंतर परराज्यात बालकांची विक्री करणारे मोठे रॅकेट कार्यरत असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या रॅकेटची पाळेमुळे मोठ्या शहरांसह ग्रामीण भागात रुजली असल्याचे स्पष्ट झाले आहे. बडी नावे पुढे आल्यानंतर अनेकवेळा पोलिसांची कारवाई थंडबस्त्यात जाते. मात्र, बालकांचे भावी आयुष्य पैशांच्या मोलात ठरवणारी अशी रॅकेट उद्ध्वस्त करण्याचे आव्हान पोलिसांसमोर कायम आहे.

निपुत्रिक दाम्पत्यांना लाखो रुपयांत विक्री, वाममार्गाला लावणे आदींसाठी मुला-मुलींच्या विक्रीचा गोरखधंदा तेजीत आहे. कुमारी माता किंवा बाळ नकोसे असलेल्या दाम्पत्याची माहिती घेणे, त्यांच्याशी संपर्क साधून पुढील राज्यात त्याच्या विक्रीचा घाट घालणे, यासाठी टोळ्यांचे कारनामे वाढत चालले आहेत.

इचलकरंजीतून यापूर्वी छत्तीसगड तसेच मुंबई येथे अर्भक विक्रीच्या घटना उघडकीस आल्या आहेत. पुन्हा हातकणंगले येथील बालक विक्री प्रकरणात कोरोची येथील महिलेचा सहभाग, उदगाव येथील किडनी विक्री रॅकेट, यामुळे बड्या तस्करांनी आता पश्चिम महाराष्ट्राला टार्गेट केल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे पोलिसांनी खाकीचा धाक निर्माण करीत अशा टोळ्यांना गजाआड करणे गरजेचे आहे.

मध्यस्थांचे नेटवर्क खणून काढण्याची गरज

दत्तक घेण्याच्या तसेच अन्य विविध कारणांवरून बालकांसह मुले, मुली यांच्या विक्रीचे रॅकेट मध्यस्थांच्या सहभागामुळे सक्रिय आहे. स्थानिक मध्यस्थांच्या सहभागामुळे असे व्यवहार बिनबोभाट होत असून, त्याची कुणकुण पोलिसांना लागू नये याची काळजी या मध्यस्थांकडून घेतली जाते. हातकणंगलेतील प्रकरणातही स्थानिक मध्यस्थाचा सहभाग उघड झाला असून, हे नेटवर्क उद्ध्वस्त करण्याची गरज आहे.

संशयितांकडे कसून चौकशी

अडीच वर्षांच्या बालकाची विक्री करण्याच्या उद्देशाने घेऊन जात असलेल्या संशयितांची पोलिसांनी कसून चौकशी सुरू केली आहे. मात्र, टोळीचा प्रमुख संशयित संतोषपुरी शिवपुरी गोस्वामी (वय 40, रा. बिकराई ता. सालडा, जि. भिलवाडा, राजस्थान) हा पोलिसांची दिशाभूल करीत आहे. त्यामुळे अद्याप बालक कोठून व का आणले, याबाबत स्पष्टता होऊ शकलेली नाही. लवकरच मुळापर्यंत पोहोचू, असा विश्वास पोलिस निरीक्षक के. एन. पाटील यांनी व्यक्त केला.

Back to top button