

कोल्हापूर : शिवीगाळ केल्याने इलेक्ट्रिकल केबलने गळा आवळून खून झालेल्या सिद्धू शंकर बनवी (वय 20, रा. रिंगरोड, कळंबा, मूळ हिरेनंदी, ता. गोकाक) याच्या खिशातून गावाकडून आणलेली 20 हजारांची रोकड आणि महागडा मोबाईल अज्ञाताने लंपास केल्याचा प्रकार मंगळवारी उघडकीला आला.
सिद्धू बनवी खूनप्रकरणी पोलिसांनी अटक केलेल्या मनीष राऊत (28, रा. राऊत कॉलनी, कळंबा) याला दुपारी न्यायालयात हजर केले असता त्यास शुक्रवारपर्यंत पोलिस कोठडीचा आदेश झाला आहे. शिवीगाळ केल्याने बनवी याचा खून झाला की, त्यामागे आणखी काही कारण असू शकेल, याचाही पोलिस शोध घेत आहेत. बनवी चार दिवसांपूर्वी कर्नाटकातील हिरेनंदी (गोकाक) गावी गेला होता. रविवारी सायंकाळी तो गावाकडून कोल्हापूरला परतला होता.
सायंकाळी कळंबा रिंगरोडवरील वस्तीकडे तो गेला. त्यानंतर काही वेळाने राऊतसमवेत मद्यप्राशनसाठी व्हीनस कॉर्नरला पोहोचला. तेथील एका हॉटेलमध्ये दोघांनी मद्यप्राशन केले. त्यानंतर दोघांनीही गाजांची नशा केली. त्यानंतर पुन्हा हॉटेलमध्ये येऊन मद्यप्राशन केले. दोघेही झिंगलेल्या अवस्थेत होते. त्याच्यात वादावादी झाल्यानंतर दोघांनी एकमेकाला शिवीगाळ केल्याची माहिती पोलिस चौकशीतून पुढे येत आहे. पोलिसांनी हॉटेलमधील कर्मचाऱ्यांकडेही मंगळवारी सायंकाळी चौकशी केली.
खुनामागील कारणांचा शोध सुरू
हॉटेल कर्मचारी व काही ग्राहकांसमोरच राऊतने बनवीला श्रीमुखात लगावल्याचीही माहिती पुढे येत आहे. त्यानंतर दोघांमध्ये दोन ते तीन वेळा वादावादी झाल्याचे समजते. उमा टॉकीज चौकातही दोघे काहीकाळ थांबले होते. त्यानंतर मध्यरात्री तीन वाजण्याच्या सुमारास राऊत व बनवी हॉकी स्टेडियमच्या दिशेने दुचाकीवरून गेल्याचे दिसून येते. खुनामागील नेमक्या कारणांचा पोलिस शोध घेत आहेत.