kolhapur | दोन हजार वर्षांची प्राचीन फरसबंदी खुणावतेय अभ्यासकांना

पन्हाळगडाच्या वेढ्यातून सुटकेनंतर शिवरायांनी केला होता याच फरसबंदीचा वापर
2000-year-old-ancient-paving-attracts-researchers
kolhapur | दोन हजार वर्षांची प्राचीन फरसबंदी खुणावतेय अभ्यासकांनाPudhari File Photo
Published on
Updated on

सागर यादव

कोल्हापूर : शिवकालीन इतिहासाच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी दरवर्षी भरपावसात पन्हाळगड ते पावनखिंड साहसी पदभ्रमंती मोहिमांचे आयोजन केले जाते. या ऐतिहासिक मार्गावरच सुमारे दोन हजार वर्षांपूर्वीच्या फरसबंदी मार्गाचेही अवशेष जागोजागी आपले अस्तित्व टिकवून आहेत. प्राचीन इतिहासाचा अस्सल पुरावा असे पुरातत्त्वीय महत्त्व असणारा फरसबंदी मार्ग संशोधकांना खुणावत आहे. शेती, रस्ते व तत्सम कारणांसाठी हा फरसबंदी मार्ग नष्ट होत आहे. या ऐतिहासिक वारशाच्या सखोल संशोधनाबरोबरच तातडीने त्याच्या जतन-संवर्धन-संरक्षणाची आवश्यकता आहे.

प्राचीन काळात तत्कालीन स्थानिक सपाट दगड-गोटे व मातीच्या वापरातून तयार केलेली वाट म्हणजे ‘फरसबंद’ होय. वाहतुकीसह अवजड वस्तूंची ने-आण करण्यासाठी फरसबंदी मार्गांची निर्मिती करण्यात आली होती. फरसबंदी वाट (Pavement paths) तयार करण्यासाठी नैसर्गिक दगडांचा वापर केला जात असे.

असा तयार केला जायचा फरसबंदी रस्ता

फरसबंदीसाठी दगडांचा वापर सर्वप्रथम रोमन लोकांनी केल्याच्या नोंदी आहेत. प्राचीन काळात रस्ते बांधताना आजच्यासारखी आधुनिक यंत्रसामग्री उपलब्ध नव्हती. नैसर्गिक सपाट व मोठ्या ग्रॅनाईट, चुनखडी किंवा तत्सम दगडांचा वापर केला जायचा. हे दगड एकमेकांना जोडून किंवा जोडून न घेता पृष्ठभागावर पसरवले जात. यासाठी दगडांची निवड करताना त्यांची जाडी आणि आकार यांचा विचार केला जायचा.

अनेकदा लहान दगड, खडी आणि मातीचा वापर करून रस्ता बनवला जायचा. फरसबंदी वाटांमध्ये, पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी योग्य व्यवस्था केली जायची. यासाठी रस्त्याच्या कडेला उतार दिला जायचा. महाराष्ट्रात नाणेघाट-जुन्नर, पसरणीचा किंवा हातलोट घाट-सातारा आणि अनुस्कुरा घाट-कोल्हापूर या तीन ठिकाणी प्राचीन फरसबंदीचे अवशेष आपले अस्तित्व टिकवून आहेत.

कोल्हापूर जिल्ह्यातील फरसबंदीचे अवशेष

कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा-शाहूवाडी भागातील अणुस्कुरा घाट परिसरात कोकण आणि देशाला जोडणार्‍या सह्याद्री पर्वत रांगेत ठिकठिकाणी फरसबंदी मार्गाचे अवशेष आहेत. किंबहुना कोकण आणि देशाला जोडणारा प्राचीन काळापासूनचा हा व्यापारी मार्ग आहे. सह्याद्री रांगेतून जाणार्‍या घाट मार्गातून कोकणातील पाचल-अणुस्कुरा-मौसम-मलकापूर-कोल्हापूर असा हा मार्ग आहे. अणुस्कुराचा सध्याचा घाट (नवा) सुरू होण्यापूर्वी उजव्या हाताला असणार्‍या फाट्याजवळ प्राचीन मार्ग आहे. अणुस्कुरा घाटातील फरसबंदी प्रमाणेच पांढरेपाणी (पूर्वीचे चौकेवाडी) ते पावनखिंड परिसरात पाहायला मिळतो. फरसबंदी मार्ग वळणे घेत खाली उतरला आहे. फरसबंदी मार्गावर मंदिर, शिलालेख, पाण्याचे कुंड, पाण्याचा मार्ग आणि बांधकामासाठीच्या चुन्याच्या घाणीचे चाक असे अवशेषही आहेत. शिवकाळात या फरसबंदी मार्गाचा वापर झाल्याचे उल्लेख आढळतात.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news