.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
कोल्हापूर : मुलींना रोजगारनिर्मितीसाठी चालना देत, त्यांचे आर्थिक, सामाजिक पुनर्वसन करणे, त्यांना स्वावलंबी बनविण्यासाठी तसेच महिला व मुलींचा प्रवास सुरक्षित होण्यासाठी महिलांसाठी ‘पिंक ई-रिक्षा’ खरेदीसाठी अर्थसाहाय्य करण्याची घोषणा राज्याच्या अर्थसंकल्पात केली होती. त्यानुसार कोल्हापूर जिल्ह्यातील 200 महिलांना या रिक्षा देण्यात येणार आहेत. कोल्हापूरसह राज्यातील 17 शहरांतील एकूण दहा हजार महिला लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे. या योजनेंतर्गत चार लाखांपर्यंतची ई-रिक्षा खरेदीसाठी बँकेतून 70 टक्के रक्कम कर्ज स्वरूपात दिली जाणार आहे. 20 टक्के रक्कम राज्य शासन देणार असून, 10 टक्के रक्कम लाभार्थ्याला भरावी लागणार आहे. बँकेच्या कर्जाची पाच वर्षांत परतफेड करावी लागणार आहे. निश्चित केलेल्या लाभार्थ्यांपेक्षा जादा अर्ज आल्यास लॉटरी पद्धतीने निवड केली जाणार आहे.
राज्यातील गरजू आणि 18 ते 35 वर्षे वयोगटातील, तीन लाखांपेक्षा कमी वार्षिक उत्पन्न, वाहनचालक परवाना असलेल्या महिला व मुली, विधवा, घटस्फोटित, राज्यगृहातील इच्छुक प्रवेशित, अनाथ प्रमाणपत्र प्राप्त युवती, अनुरक्षणगृह, बालगृहातील आजी व माजी प्रवेशित तसेच दारिद्य्ररेषेखालील महिलांना प्राधान्य राहणार आहे.
महिला व बालविकास विभागाकडे ऑनलाईन अर्ज, त्यासोबत आधार व पॅन कार्ड, राज्याचे अधिवास प्रमाणपत्र, कुटुंबप्रमुखाचा उत्पन्नाचा दाखला, बँक पासबुक, पासपोर्ट आकाराचा फोटो, मतदार ओळखपत्र अथवा मतदारयादीत नाव असल्याचा दाखला, रेशन कार्ड, लाभार्थीच रिक्षा चालवणार याचे हमीपत्र, चालक परवाना, अटी-शर्तींचे पालन करणारे हमीपत्र.
जिल्हाधिकार्यांच्या अध्यक्षतेखाली सहा सदस्यीय समिती लाभार्थ्यांची निवड करणार आहे. यामध्ये परिवहन, उद्योग व ऊर्जा विभागांचे प्रत्येकी एक अधिकारी, महिला आर्थिक विकास महामंडळ जिल्हा समन्वयक, नागरी बालविकास प्रकल्प अधिकारी आणि जिल्हा महिला बालविकास अधिकारी यांचा समावेश असेल.
या ‘पिंक ई-रिक्षा’ केवळ महिला व मुलींसाठीच आहेत. यामुळे या रिक्षा पुरुषचालकाने चालवल्यास त्यांच्यावर कारवाई होणार आहे. वाहतूक व परिवहन विभागाला त्याचे अधिकार देण्यात आले आहेत.
मुंबई उपनगर (1,400), ठाणे (1,000), पुणे (1,400), नाशिक (7,00), नागपूर (1,400) कल्याण (4,00), अहमदनगर (4,00), नवी मुंबई (500), पिंपरी (300), अमरावती (300), चिंचवड (300), पनवेल (300), छत्रपती संभाजीनगर (400), डोंबिवली (400), वसई-विरार (400), कोल्हापूर (200) व सोलापूर (200).