

संतोष बामणे
जयसिंगपूर : गेल्या 8 दिवसांपासून धरण व पाणलोट क्षेत्रात होत असलेल्या संततधार पावसामुळे कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यांतील नद्या दुथडी भरून वाहत आहेत. त्यामुळे 123 टीएमसी क्षमता असलेल्या अलमट्टी धरणातील पाणी सोमवार (दि. 18) पासून गुरुवार (दि. 21) या 4 दिवसांत तब्बल 20 टीएमसी खाली केले आहे. त्यामुळे कर्नाटक व महाराष्ट्र राज्यातील समन्वयकच महत्त्वाचा दुवा ठरला आहे.
सध्या अलमट्टी धरणात 80 टक्के पाणी असून, 122 टीएमसीवरून आता 98.87 टीएमसी म्हणजेच 20 टीएमसी पाणी फक्त 4 दिवसांत अलमट्टीने विसर्ग केला आहे. गुरुवारी सायंकाळी 5 वाजता अलमट्टी धरणातून 1 लाख 95 हजार क्युसेक पाण्याची आवक होती. तर अलमट्टीच्या 26 दरवाजांतून 2 लाख 50 हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरूच आहे. दरम्यान, गुरुवारी 3 लाख क्युसेक विसर्ग करण्याचे नियोजन करण्यात आले होते. मात्र, सह्याद्री घाट माथ्यावर पावसाचा जोर कमी आल्याने पाण्याचा फ्लो कमी होत आहे. त्यामुळे अलमट्टी धरणातून 3 लाख विसर्ग न करता अडीच लाखच सुरू आहे. हिप्परगी (ता. जमखंडी) येथील बॅरेंजमध्ये 1 लाख 92 हजार 500 क्युसेक पाण्याची आवक असून, जावकही 1 लाख 92 हजार 500 क्युसेकच आहे.