

कोल्हापूर : काँग्रेसच्या माजी नगरसेवकांच्या शिवसेना प्रवेशावर मंगळवारी शिक्कामोर्तब झाले. आ. सतेज पाटील यांचे कट्टर समर्थक शारंगधर देशमुख यांच्यासह 20 माजी नगरसेवक आणि युवक काँग्रेस पदाधिकार्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. या नाट्यमय घडामोडीने आ. पाटील यांना धक्का बसला आहे. दरम्यान, माजी नगरसेवक महेश कदम यांचा शिवसेना प्रवेश आमदार राजेश क्षीरसागर यांच्या सूचनेनुसार थांबविण्यात आला आहे.
महापालिकेत गेली अनेक वर्षे सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीने सत्ता कायम राखली आहे. या सत्तेच्या सारीपाटात शारंगधर देशमुख यांनी कारभार्याची भूमिका पार पाडली आहे. विधानसभा निवडणुकीनंतर मात्र सतेज पाटील यांच्यापासून फारकत घेतलेल्या देशमुख यांनी शिवसेनेशी सलगी वाढविली. गेल्या काही दिवसांत त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन पक्ष प्रवेशाचे संकेत दिले होते. पालकमंत्री प्रकाश आबिटकर आणि आ. क्षीरसागर यांच्या पुढाकाराने महापालिकेत सत्तापरिवर्तनासाठी मोट बांधली जात आहे. त्याचाच भाग म्हणून काँग्रेसच्या माजी नगसेवकांवर लक्ष केंद्रित करून त्यांना शिवसेनेत आणण्याचे प्रयत्न सुरू होते. या प्रयत्नांना यश आले असून, शारंगधर देशमुख यांच्या पुढाकाराने 20 माजी नगरसेवकांनी थेट मुंबईत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी पालकमंत्री प्रकाश आबिटकर, आ. राजेश क्षीरसागर, माजी आमदार जयश्री जाधव, सत्यजित कदम उपस्थित होते. माजी नगरसेवक आणि युवक काँग्रेसच्या पदाधिकार्यांसह कार्यकर्त्यांनी काँग्रेसकडे पाठ फिरवून शिवसेनेचा भगवा हातात घेतला आहे. त्यामुळे आ. सतेज पाटील यांना मोठा धक्का बसला आहे. याबरोबरच भाजपच्याही काही माजी नगरसेवकांनी शिंदे शिवसेनेत प्रवेश केला. माजी स्थायी समिती सभापती, शारंगधर देशमुख, माजी महापौर निलोफर आजरेकर, माजी महापौर प्रतिभा नाईकनवरे, दिगंबर फराकटे, माजी नगरसेवक संभाजी जाधव, रशीद बारगीर, अभिजित चव्हाण, रिना कांबळे, पूजा नाईकनवरे, अश्विनी बारामते, सुनंदा मोहिते, अनुराधा खेडकर, गीता गुरव, प्रकाश नाईकनवरे, संगीता सावंत, जहाँगीर पंडत, भरत लोखंडे, आनंदराव खेडकर, इस्माईल बागवान, अश्पाक आजरेकर यांनी शिवसेनेत प्रवेश केला.
याबरोबरच युवक काँग्रेसच्या पदाधिकार्यांनी काँग्रेसला रामराम करून शिवसेनेत प्रवेश केला आहे. यामध्ये जिल्हा युवक काँग्रेस अध्यक्ष किरण पाटील, अभिजित खतकर, जिल्हा सचिव कुलदीप सावतकर, जिल्हा सरचिटणीस संजय सावंत, विद्यार्थी काँग्रेस जिल्हाध्यक्ष पार्थ मुडे, शिक्षक सेल जिल्हा कार्याध्यक्ष अनिल इंगळे, सुजय चव्हाण, इजाज नागरकट्टी, विश्वविक्रम कांबळे, आदर्श खडके, दत्ता हळदे, वसीम कांडेकर, अनिकेत कामत, बाबुराव बाडके, महेंद्र कोरडे, युवराज पाटील यांनीही शिवसेनेत प्रवेश केला आहे.