

कोल्हापूर : शाळांना गणवेश पुरवठा करणार्या तक्रारदार महिला समूहाच्या देय 18 लाख 35 हजारांच्या बिलासाठी 80 हजारांच्या लाचेची मागणी करून स्वीकारल्याप्रकरणी महिला आर्थिक विकास महामंडळाच्या येथील दोन वरिष्ठ अधिकार्याविरुद्ध शनिवारी रात्री लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. जिल्हा समन्वय अधिकारी सचिन सीताराम कांबळे (वय 45, रा. देवकर पाणंद, मूळ पाचगाव, करवीर) व सहायक सहनियंत्रक उमेश बाळकृष्ण लिंगनूरकर (46, सिद्धार्थनगर, कोल्हापूर) अशी त्यांची नावे आहेत.
नागाळा पार्क येथील महिला आर्थिक महामंडळांच्या दोन वरिष्ठ अधिकार्याविरुद्ध लाचप्रकरणी गुन्हा दाखल झाल्याने खळबळ उडाली आहे. लाचलुचपत प्रतिबंध पथकाने कांबळे व लिंगनूरकर यांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर अटकेची कारवाई केली. पोलिस उपअधीक्षक वैष्णवी पाटील व पथकाने सापळा रचून कारवाई केली. तक्रारदार समूहाची शाळकरी मुलांचे कपडे तयार करण्याची गारमेंट असून, जिल्हा परिषदेसह खासगी शाळांना गणवेश तयार करून देण्याचे काम समूह करत असते. नागाळा पार्क येथील महिला विकास महामंडळामार्फत स्वयंसाहाय्यता महिला समूहाला जिल्हा परिषदेच्या 19 केंद्र शाळांना गणवेश पुरवठा करण्याचे कंत्राट देण्यात आले होते. करारानुसार तक्रारदार समूहाने सदरचे काम पूर्ण करून दिले होते.
सदर कामाच्या देय असलेल्या 18 लाख 35 हजार 814 रुपयांच्या बिलासाठी तक्रारदार समूहाने महिला आर्थिक विकास महामंडळाच्या वरिष्ठ अधिकार्यांकडे पाठपुरावा केला होता. एकूण बिलापैकी 14 लाख 35 हजार रुपये समूहाच्या बँक खात्यामध्ये वेळोवेळी जमा झाले होते. उर्वरित बिलासाठी समूहाने महामंडळाचे सहायक सहनियंत्रक अधिकारी उमेश लिंगनूरकर यांची भेट घेऊन विचारणा केली असता, त्यांनी उर्वरित रकमेच्या बिलासाठी महामंडळाचे जिल्हा समन्वयक अधिकारी व मला स्वत:ला मिळून 80 हजार रुपये द्यावे लागेल, असे बजाविले होते. तक्रारदार समूहाने लाचलुचपत प्रतिबंध पथकाच्या पोलिस उपअधीक्षक वैष्णवी पाटील यांची भेट घेऊन तक्रार दाखल केली होती. पथकाने पडताळणी केली असता, तक्रारीत तथ्थ आढळून आले. बिलाच्या पूर्ततेसाठी दोन्हीही अधिकार्यांनी 80 हजारांच्या लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. पथकाच्या सापळ्यानुसार, सहायक सहनियंत्रक उमेश लिंगनूरकर यांना आज दुपारी 80 हजारांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आले.
लाचप्रकरणी अटक केलेल्या सचिन पाटील व उमेश लिंगनूरकर यांच्या अनुक्रमे देवकर पाणंद, पाचगाव व सिद्धार्थनगर येथील घरांची रात्री उशिरापर्यंत झडती सुरू असल्याचे सांगण्यात आले.