पुणे-बंगळूर महामार्गावरील अपघातात महिलेसह शाळकरी मुलगी ठार ; २ जखमी

पुणे-बंगळूर महामार्गावरील अपघातात महिलेसह शाळकरी मुलगी ठार ; २ जखमी

निपाणी; पुढारी वृत्तसेवा : पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर  आज (दि.४) सकाळी कुर्ली फाटा येथे धावत्या दुचाकीचा टायर पंक्चर होऊन झालेल्‍या अपघात महिला व युवती ठार झाल्या. तर दुचाकीस्वार व बालक  गंभीर जखमी झाले. लक्ष्मी आनंद कोप्पद (वय 25, रा. मुगळीहाळ ता. सौंदत्ती व भाग्यश्री सागर वाकमी (वय13, रा. कटकोळ (ता. रामदुर्ग) असे मयत झालेल्या महिला व युवतीचे नाव आहे. तर गंभीर जखमी दुचाकीस्वार हणमंत व्यंकाप्पा सक्री (वय 23 ) व बालक मारुती रमेश चुनामदार (वय 6, दोघेही रा. गोरमगोळ ता. सौंदत्ती जि. बेळगाव) यांच्यावर येथील सरकारी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनेची नोंद ग्रामीण पोलिसांत झाली आहे.

याबाबतची अधिक माहिती अशी की, अपघातातील मृत व जखमी हे एकमेकांचे नातेवाईक आहेत. ते सर्वजण गेल्या अनेक वर्षापासून आपल्या कुटुंबियासमवेत बांधकाम मजुरीसाठी संभाजीनगर (कोल्हापूर) येथे वास्तव्यात आहेत. मंगळवारी सकाळी दुचाकीस्वार हणमंत हा आपल्या नात्यातील लक्ष्मी कोप्पद, भाग्यश्री वाकमी, मारुती चुनामदार या तिघांना घेऊन आपल्या मूळगावी दसरा सणासाठी जात होते. यावेळी पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर हणमंत यांची दुचाकी सौंदलगा हद्दीत कुर्ली फाटा येथे आली असता अचानकपणे दुचाकीचे मागील चाक पंक्चर झाले. त्यामुळे हणमंत याचा दुचाकीवरील ताबा सुटला. त्यामुळे दुचाकी रस्त्याच्या बाजूला असलेल्या संरक्षक खांबाला जाऊन धडकल्याने चौघेजण जोराने खाली कोसळले.

यामध्ये भाग्यश्री हिचा जागीच मृत्यू झाला. तर इतर तिघेजण गंभीर जखमी झाले. दरम्यान अपघाताची माहिती मिळतात रस्ते देखभाल जयहिंद कंपनीच्या भरारी पथकाचे निरीक्षक अमोल नाईक व पोलीस भरारी पथकाने घटनास्थळी धाव घेऊन जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल केले. लक्ष्मी हिची प्रकृती चिंताजनक बनल्याने तिला पुढील उपचारासाठी कोल्हापूर येथे नेत असताना तिचा वाटेतच मृत्यू झाला. तर हणमंत व मारुती यांच्यावर सध्या येथील सरकारी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान घटनास्थळी उपाधीक्षक बसवराज यलीगार, सीपीआय संगमेश शिवयोगी, ग्रामीण पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक अनिलकुमार यांनी भेट देऊन पाहणी केली. पुढील तपास सीपीआय संगमेश शिवयोगी करत आहेत.

अर्धा कि. मी. मध्ये 24 तासात 3 अपघातात 2 ठार 15 गंभीर

गेल्या 24 तासांमध्ये सौंदलगा हद्दीतील कुर्ली फाटा ते कळंत्रे मळा या टापूत देवदर्शनासाठी जाणाऱ्या दोन कारला सोमवारी अपघात झाला होता. यामध्ये 13 जण जखमी झाले होते. या दोन घटना ताज्या असतानाच मंगळवारी याच टापूत दुचाकीला अपघात होऊन युवती व महिला ठार झाल्या. तर दोघेजण गंभीर जखमी झाले. त्यामुळे कुर्ली फाटा ते कळंत्रे मळा हे अर्धा कि. मी. चे अंतर धोक्याचे व (ब्लॅक स्पॉट) ठरले आहे.

बसने प्रवास झाला असता तर. …

अपघातातील मयत लक्ष्मी व भाग्यश्री या दोघींनी दुचाकीस्वार हणमंत याला आपण बसने गावी येतो. कोल्हापूर बसस्थानकावर सोडा, असे म्‍हटलं  होते. मात्र, अचानकपणे निर्णय बदलल्याने हणमंत हा  युवती, महिला व जखमी बालक या तिघांना घेऊन दुचाकीवरून येत असताना काळाने लक्ष्मी व भाग्यश्री यांना हिरावून नेले. रुग्णालय परिसरात त्यांच्या कुटुंबियांनी केलेला आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता. यावेळी नातेवाईकांनी मोठी गर्दी केली होती.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news