

कोल्हापूर : ‘मोका’अंतर्गत कारवाई झालेल्या गोकुळ शिरगाव (ता. करवीर) येथील विनायक मोहन पाटील (वय 29, रा. म्हसोबा माळवाडी) याच्या कब्जातून 66 हजार रुपये किमतीचा 2 किलो 600 ग््रॉम गांजा मंगळवारी जप्त करण्यात आला. संशयिताच्या घरी छापा टाकून पथकाने ही कारवाई केली. कर्नाटकातून गांजाची आवक केल्याची प्राथमिक माहिती चौकशीतून पुढे येत आहे.
संशयित विनायक पाटील पूर्वी गोकुळ शिरगाव परिसरातील इमानभाई टोळीमध्ये कार्यरत होता. म्होरक्यासह संशयितावर 2021 मध्ये ‘मोका’ अंतर्गत कारवाई झाली होती. गोकुळ शिरगावसह उजळाईवाडी परिसरातील परप्रांतीय, स्थानिक कामगारासाठी संशयित गांजा तस्करी करीत होता. असे स्थानिक गुन्हे अन्वेषणचे निरीक्षक सुशांत चव्हाण यांनी सांगितले. गांजा तस्करीतील गुंतलेल्या कर्नाटकासह सीमाभागातील संशयितांचा छडा लावून त्यांनाही लवकरच जेरबंद करण्यात येईल,असे त्यांनी सांगितले. संशयिताला गोकुळ शिरगाव पोलिसांच्या हवाली करण्यात आले आहे.