पंचविशीतच गाठतोय ‘उच्च रक्तदाब’, ही आहेत कारणे | पुढारी

पंचविशीतच गाठतोय ‘उच्च रक्तदाब’, ही आहेत कारणे

कोल्हापूर/औरंगाबाद : राहुल जांगडे

जीवघेण्या स्पर्धेच्या युगात नोकर्‍या दिवसेंदिवस कमी होत आहेत. बेरोजगारीचे प्रमाण वाढत आहे. युवावर्ग नैराश्याच्या गर्तेत लोटला जात आहे. ‘पुढे आपले कसे होईल, कुटुंबाचे काय होईल,’ ही सततची चिंता लागून राहते. अतिमानसिक तणावामुळे अगदी पंचविशीतील तरुणांतही उच्च रक्तदाबाचा धोका वाढल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांनी सांगितले.

‘हायपरटेन्शन’विषयी सामान्य लोकांमध्ये जागरूकता वाढविण्याची गरज आहे. त्यासाठी जगभर 17 मे रोजी ‘जागतिक उच्च रक्तदाब दिन’ पाळला जातो. उच्च रक्तदाब हा साधारणपणे वयाच्या पन्नाशीनंतर होणारा आजार म्हणून ओळखला जातो; परंतु कोरोना संकटानंतर आता अगदी 25 ते 30 वयोगटातील तरुणही हायपरटेन्शनच्या विळख्यात सापडल्याचे दिसत आहे. रक्तदाब वाढण्याची कारणे वेगवेगळी आहेत. बदलती जीवनशैली, आनुवंशिकता, लठ्ठपणा, आहारात मिठाचे प्रमाण अधिक, मधुमेह, थॉयराईड, किडनीचे विकार, व्यायामाचा अभाव, सिगारेट, तंबाखू, दारूचे व्यसन ही त्यामागील कारणे आहेत. आता बेरोजगारीसुद्धा रक्तदाब वाढण्याचे कारण ठरत आहे. उच्च शिक्षण घेऊनही नोकरी, व्यवसाय नसल्याने युवा पिढीला भविष्याची चिंता लागली आहे. ते साहजिक आणि स्वाभाविकही आहे; परंतु सध्याच्या परिस्थितीमुळे तरुण मानसिक तणावाखाली वावरत आहे. परिणामी, रक्तदाब वाढून हृदय, मेंदू आणि किडनीच्या कार्यक्षमतेवर परिणाम होतो. त्यामुळे प्रत्येकाने आपल्या शरीरातील रक्तदाब वाढणार नाही, याची काळजी घेतली पाहिजे. नियमित ध्यानधारणा, योगा, व्यायाम केला पाहिजे, असा सल्ला वैद्यकीय तज्ज्ञ देतात.

‘सायलेंट किलर’ का म्हणतात?

उच्च रक्तदाबाची कोणतीही विशिष्ट लक्षणे किंवा संकेत नसल्यानेच त्याला ‘सायलेंट किलर’ असे म्हणतात. त्यासाठी डॉक्टर वारंवार रक्तदाब तपासण्याचा सल्ला देतात, तरीही सकाळी डोके दुखणे, नाकातून रक्त येणे, हृदयाची असामान्य गती, कान वाजणे, थकवा, मळमळ, अस्वस्थता, छातीत दुखणे आणि स्नायूंमध्ये वेदना जाणवणे, अशी उच्च रक्तदाबाची सामान्य लक्षणे आहेत.

बेरोजगारीमुळे वाढतोय मानसिक तणाव

उच्च रक्तदाबाचा विकार असणार्‍यांत तरुणांचे प्रमाण चिंताजनक आहे. हायपरटेन्शनमुळे अर्धांगवायू, हृदयविकार होऊ शकतो. काही आजार नसताना हायपरटेन्शन असणे म्हणजे रुग्ण मानसिक तणावाखाली असल्याचे लक्षण आहे.
– डॉ. राहुल वाहटुळे, न्यूरोलॉजिस्ट, एम.डी., मेडिसीन

Back to top button