

दिलीप भिसे
कोल्हापूर : शहर व जिल्ह्यात घुसखोरी केलेल्या परप्रांतीय अमली तस्करांसह बेधुंद व्यसनाला बळी पडलेल्या 17 ते 25 वयोगटातील नशेखोरांवर कायद्याचा धाकच राहिला नाही, अशीच काहीशी समाजाची घालमेल करणारी स्थिती आहे. क्षुल्लक कारणातूनही बेभान होत धारदार शस्त्रे बाहेर काढत भरदिवसा रक्ताचा सडा पाडला जात आहे... अलीकडच्या काळात तर तस्करांसह गुन्हेगारी टोळ्यांच्या फोफावलेल्या दहशतीला रोखण्याचे मोठे आव्हान आहे. कोल्हापूर जिल्ह्यात 38 महिन्यांत पाच-पन्नास नव्हे, तब्बल 183 जणांचे खून पडले आहेत. समाजमन सुन्न करणारी... काळजाचा थरकाप उडविणारी स्थिती निर्माण झालेली असतानाही एकाही लोकप्रतिनिधीकडून त्याचा जाब विचारला जात नाही... हीच चिंता वाढविणारी बाब आहे.
शहर, जिल्ह्यात काळे धंदे, गुन्हेगारी टोळ्यांचे कंबरडे मोडले जात असल्याचा वरिष्ठ अधिकार्यांकडून दावा केला जात असला तरी स्थानिक पातळीवर मात्र संघटित गुन्हेगारांसह आंतरराज्य अमली तस्करी टोळ्यांचे उघड उघड कारनामे चालूच राहिले आहेत. अत्याधुनिक शस्त्रांची रेलचेल सुरूच आहे. एमडी ड्रग्जसह गांजाची शहरात विशेषत: राजारामपुरी येथील मध्यवर्ती सायबर चौक, शेंडा पार्क, उजळाईवाडी उड्डाणपूल, तावडे हॉटेलसह सांगली फाटा तसेच सीमावर्ती पट्ट्यात अमली तस्करांचा विळखा पडलेला दिसून येतो.
म्होरक्याचा आश्रयदाता कोण... ‘मोका’अंतर्गत कारवाई होणार का?
कोल्हापुरातल्या फुलेवाडी रिंग रोडवर गतवर्षी 13 सप्टेंबर 2025 मध्ये थरार घडला. टोळीयुद्धातून गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या महेश राख याला गंगाई लॉनच्या पिछाडीस प्रतिस्पर्धी टोळीचा म्होरक्या सिद्धांत गवळीसह त्याच्या साथीदारांनी पाठलाग करून भर रस्त्यावर मुडदा पाडला. करवीर पोलिसांनी 15 जणांवर गुन्हा दाखल करून 14 जणांना यापूर्वी अटक केली होती. मात्र म्होरक्या साडेपाच महिने फरार होता. सिद्धांत गवळी याच्या वास्तव्याची दबक्या आवाजात चर्चा होती. एव्हाना त्याला आश्रय देणार्यांचीही उघड चर्चा होती. मात्र या म्होरक्याला मुंबईतून अटक करण्यात आल्याचे सांगण्यात आले. खुनासारख्या गंभीर गुन्ह्यात फरार असलेल्या मारेकर्याला कोणी आश्रय दिला, कोणी रसद पुरविली, हे प्रश्न अद्यापही अनुत्तरित आहेत. आश्रयदात्यावर पोलिस कारवाई करणार का, टोळीवर मोका लावण्याची गर्जना करण्यात आली होती. त्याचा अंमल होणार का, याकडे सार्यांच्या नजरा लागल्या आहेत.
टोळीयुद्धात एक म्होरक्या संपला...
टोळीयुद्धातून महेश राख याची हत्या झाली; पण नव्याने 15 गुन्हेगार पोलिस रेकॉर्डवर आले. फुलेवाडी रिंग रोड हा परिसर गोरगरिबांसह मध्यमवर्गीयांची वसाहत म्हणून ओळखला जातो. अलीकडे परिसरात अनेक गंभीर घटना परिसरात घडल्या आहेत. रेकॉर्डवर 15 नवीन गुन्हेगार आले. भविष्यात त्यांची दहशत कशी थोपविणार हा प्रश्न आहे.
नशेखोरांकडून खुन्नस, फुकटची दारू अन् तंबाखू, चुन्यासाठीही खून!
अमली तस्करांच्या उलाढाली वाढल्याने किंबहुना तरुणाईला बेधुंद करणारे जीवघेण्या ड्रग्ज, गांजासह कोल्हापुरात नव्याने आवक झालेला हायड्रोपोनिक गांजा सहज उपलब्ध होऊ लागल्याने शहरासह जिल्ह्यातील गुन्हेगारी धोक्याच्या वळणावर येऊन ठेपली आहे. खुन्नस दिली, रागाने पाहिले, शिवीगाळ केली, दारू फुकट दिली नाही, तंबाखूच नव्हे तर चुना दिला नाही म्हणूनही मुडदे पाडले जाताहेत... अमली पदार्थांसह गांजा सेवनातून थेट मालकाच्या गोदामावर, आलिशान बंगल्यावर दरोडा टाकून कोट्यवधीचा ऐवज लुटला जात असल्याच्या घटनाही घडल्या आहेत.
नशेच्या मागे धावत सुटली... खुनाच्या गुन्ह्यात अडकत गेली!
दहा-पंधरा वर्षांपूर्वी राजकीय सूडचक्र, पूर्ववैमनस्य, जमीन, आर्थिक वाद, अनैतिक संबंधातून खुनाच्या घटना घडत. मात्र अलीकडच्या काळात क्षुल्लक कारणातूनही कोवळ्या वयोगटातील पोरांकडून खुनासारख्या गंभीर घटनांचे प्रकार दिसून येत आहेत. घरची परिस्थिती, जबाबदारीचे भान हरविलेली तरणी पोरं गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या साथीदारांसमवेत व्यसनाच्या मागे धावत सुटली आहेत. समाजातील ही वस्तुस्थिती सार्यांचीच चिंता वाढविणारी आणि सामाजिक स्वास्थ्य धोक्यात आणू पाहणारी आहे.
38 महिन्यांत खुनाची मालिका... तब्बल 183 जणांचे मुडदे!
कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात विशेषत: ग्रामीण भागात जानेवारी 2023 ते 15 मार्च 2026 या काळात म्हणजे 38 महिन्यांत तब्बल 183 जणांचे मुडदे पडले आहेत. त्यात 2023 मध्ये 62, 2024 मध्ये 58 जणांचे, 2025 मध्ये 51 जणांचे तर एक जानेवारी ते 15 मार्च 2026 या काळात 12 जणांचे जिल्ह्यात खून पडले आहेत. कोल्हापूर शहरासह इचलकरंजी, कबनूर, तारदाळ, गडहिंग्लज, गांधीनगर, कुरुंदवाड, जयसिंगपूर, शहापूर परिसरातील खुनाच्या घटना चिंता वाढविणार्या आहेत.