Kolhapur Municipal Corporation Election | शक्तिप्रदर्शनाने अर्ज; कार्यालयांत गर्दी

Kolhapur Municipal Corporation Election
Kolhapur Municipal Corporation Election | शक्तिप्रदर्शनाने अर्ज; कार्यालयांत गर्दीFile photo
Published on
Updated on

कोल्हापूर : कोल्हापूर महापालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी सोमवारी सात निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयांत एकूण 177 उमेदवारी अर्ज दाखल झाले. अनेकांनी जोरदार शक्तिप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केले. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आलेले समर्थक, पक्षांचे कार्यकर्ते यामुळे निवडणूक निर्णय अधिकार्‍यांच्या कार्यालयांचा परिसर गर्दीने फुलला होता.

तब्बल पाच वर्षांच्या प्रतीक्षेनंतर महापालिकेची निवडणूक होत आहे. निवडणूक जाहीर झाल्यापासून इच्छुकांच्या तयारीला वेग आला होता. मात्र, उमेदवारी निश्चित होत नसल्याने उमेदवारी अर्ज भरण्याच्या पहिल्या दिवसापासून (दि. 23) चौथ्या दिवसापर्यंत (दि. 27) केवळ 29 अर्जच दाखल झाले होते. मात्र, उमेदवारी अर्जांची विक्रमी 2 हजार 185 इतकी विक्री झाली होती. उमेदवारी जाहीर होताच आणि उमेदवारी अर्ज दाखल करण्यास दोनच दिवस शिल्लक राहिल्याने सोमवारी निवडणूक कार्यालयात गर्दी होईल, अशी शक्यता होती. त्यानुसार प्रशासनाने निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालय परिसरात बंदोबस्ताचे तसेच कार्यालयात अधिकारी, कर्मचार्‍यांचे नियोजन केले होते. सोमवारी दिवसभरात सातही निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयांत एकूण 177 अर्ज दाखल करण्यात आले.

सकाळी साडेनऊ, दहा वाजल्यापासूनच उमेदवार, त्यांचे कार्यकर्ते, समर्थक कार्यालयाकडे येत होते. कार्यालयाच्या आवारात ठिकठिकाणी बॅरेकेडिंग केले होते. तेथून एकाच प्रवेशद्वारातून प्रवेश दिला जात होता. पोलिस चौकशी करूनच उमेदवार आणि त्यांच्यासमवेत नियमानुसार परवानगी असलेल्या मोजक्याच व्यक्तींना कार्यालयात सोडत होते. कार्यालयात येऊन कागदपत्रांची तपासणी करून निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे अर्ज सादर केला जात होता. यानंतर कार्यालयाबाहेर विजयाची खूण दाखवत उमेदवार, कार्यकर्ते कार्यालयाच्या आवाराबाहेर पडत होते.

कार्यालयात सहयोगी उमेदवारांबरोबरच विरोधकही आमनेसामने येत होते. एकमेकांना नमस्कार करत, अलिंगन देत हास्यविनोद करत एकमेकांना शुभेच्छाही दिल्या जात होत्या. काही ठिकाणी कार्यालयात प्रवेश करण्यावरून वादावादीचेही प्रसंग घडले. पोलिसांनी काही ठिकाणी कार्यकर्त्यांना दमही देत परिसरातून हाकलून लावले. उमेदवार अर्ज दाखल करण्यासाठी गेल्यानंतर कार्यकर्ते आवारात जागा मिळेल तिथे बसून राहत होते. यामुळे विविध पक्षांचे ध्वज, त्यासोबत स्कार्फ आणि डोक्यावर टोप्या घातलेल्या कार्यकर्त्यांनी संपूर्ण परिसर सर्वपक्षीय झाला होता.

अनेक उमेदवारांनी जोरदार शक्तिप्रदर्शन केले. ढोल-ताशांच्या गजरात मिरवणुकीने उमेदवार अर्ज दाखल करण्यासाठी दाखल झाले. काहीजणांनी मोटारसायकल रॅली काढत उमेदवारी अर्ज दाखल केला. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी महिला कार्यकर्त्यांची गर्दी अधिक होती. गळ्यात पक्षांचे स्कार्फ, डोक्यावर टोप्या, हातात फलक घेऊन कार्यकर्ते मिरवणुकीत सहभागी झाले होते. उमेदवारांच्या घोषणांनी निवडणूक कार्यालयाकडे जाणारा मार्ग दुमदुमून जात होता.

महापालिकेच्या 20 प्रभागांतील 81 नगरसेवकांच्या जागांसाठी निवडणूक होत आहे. चार दिवसांत मोठ्या प्रमाणात उमेदवारी अर्जांची विक्री झाली. मात्र, शनिवारपर्यंत केवळ 29 उमेदवारी अर्ज दाखल झाले. अनेक राजकीय पक्षांनी अधिकृत उमेदवारी यादी जाहीर न केल्याने अर्ज दाखल करण्याची प्रक्रियेला शनिवारपर्यंत गतीच आली नव्हती. महाविकास आघाडीने आपले काही उमेदवार जाहीर केले, तिसर्‍या आघाडीनेही आपले उमेदवार जाहीर केले. यामुळे सोमवारी अर्ज भरण्यास वेग आला होता. सर्व कार्यालयांत उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेवर सीसीटीव्ही कॅमेर्‍यांची नरज होती. अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेचे व्हिडीओ चित्रीकरणही करण्यात येत होते.

शहरात वाहतूक कोंडी?

महापालिका निवडणुकीचा फिव्हर दिवसेंदिवस वाढत असून, उमेदवारी अर्ज भरण्याच्या अंतिम दिवशी याची पुन्हा प्रचिती आली. सोमवारी अर्ज भरण्यासाठी आलेल्या सर्वच उमेदवारांच्या समर्थकांनी मोठी गर्दी केली होती. स्वतःची दुचाकी, चारचाकी तसेच मिळेल त्या वाहनाने समर्थक आपल्या उमेदवाराचा अर्ज भरण्यासाठी आले होते. त्यामुळे शहरात दिवसभर वाहतूक कोंडी दिसून आली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news