कोल्हापूर : महापालिकेचे कर्मचारी 13 मेपासून बेमुदत संपावर | पुढारी

कोल्हापूर : महापालिकेचे कर्मचारी 13 मेपासून बेमुदत संपावर

कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा

कोरोना कालावधीत स्वतःचा जीव धोक्यात घालून सेवा बजावणार्‍या महापालिका कर्मचार्‍यांनी विविध 22 प्रलंबित मागण्यांसाठी 13 मेपासून बेमुदत संपावर जाण्याचा इशारा दिला आहे. वारंवार चर्चा करूनही प्रश्न सुटत नसल्याने महापालिका कर्मचारी संघाने मंगळवारी प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांना त्यासंदर्भात नोटीस दिली असून 12 मे रोजी मध्यरात्री बारापासून संपावर जाणार असल्याचे म्हटले आहे.

कर्मचारी संघाचे अध्यक्ष संजय भोसले यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. ते म्हणाले, प्रत्येक महिन्याच्या दहा तारखेपूर्वी कर्मचार्‍यांचे वेतन करावे. अनुकंपा तत्त्वावरील नियुक्ती तत्काळ कराव्यात, आश्वासित प्रगती योजनेच्या फरकाची रक्कम द्यावी, पदोन्नतीसाठी पात्र असलेल्या कर्मचार्‍यांना शासन निर्णयानुसार तत्काळ पदोन्नती देण्यात यावी, ठोक मानधन कर्मचार्‍यांच्या मानधनात वाढ करा. रमजान ईदसाठी तसलमात द्यावी, सातव्या वेतन आयोगातील पेन्शनरांना फरक द्या, आरोग्य व बागा खात्यातील कर्मचार्‍यांना साफसफाईसाठी लागणारे साहित्य द्यावे, फॅमिली पेन्शनसाठी संबंधित कर्मचार्‍यांच्या मयत दिनांकापासूनचा कालावधी ग्राह्य धरावा, सेवाउपदान क्रमवार देण्यासाठी दुर्लक्ष करू नये, हंगामी कर्मचार्‍यांना सेवेत कायम करावे, पाच वर्षांपेक्षा जास्त कालावधी झालेल्या कर्मचार्‍यांच्या बदल्या करा. वाढीव महागाई भत्ता द्यावा, लाडपागे कमिटीच्या शिफारशीनुसार पात्र कर्मचार्‍यांना नेमणुका द्या. सहा वर्षांपासून गणवेश नाही. सफाई कामगारांना घर खरेदी द्यावीत आदी मागण्यांचा नोटिसीत समावेश आहे. पत्रकार परिषदेला उपाध्यक्ष विजय चरापले, कार्याध्यक्ष विजय वणकुद्रे, दिनकर आवळे, सिकंदर सोनुले उपस्थित होते.

प्रमुख मागण्या…

  • झाडू व सफाई कर्मचार्‍यांना साहित्य द्यावे
  • सहा टक्के महागाई फरक द्यावा
  • पाच वर्षांपेक्षा जास्त कालावधी झालेल्या कर्मचार्‍यांच्या बदल्या कराव्यात.
  • वाढीव महागाई भत्ता द्यावा.
  • अनुकंपा तत्त्वावरील नियुक्ती तत्काळ कराव्यात.
  • शासन निर्णयानुसार पदोन्नती करावी

रिक्त पदे तत्काळ भरा : तिवले

महापालिकेचे कामकाज 1984 च्या भरतीवरच सुरू आहे. सेवानिवृत्तीनंतर कर्मचार्‍यांची भरतीच केली जात नाही. 4 हजार 754 पदे मंजूर आहेत. परंतु, 2 हजार 900 कर्मचारी कार्यरत आहेत. सुमारे 1800 पदे रिक्त आहेत. कोल्हापूर शहराची लोकसंख्या पाहता हे कर्मचारी अत्यंत नगण्य आहेत. परिणामी, रिक्त पदे तत्काळ भरावीत, असे जनरल सेक्रेटरी अजित तिवले यांनी सांगितले.

Back to top button