

कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा
जिल्ह्यात हंगाम सोडून अनैसर्गिक गुळाची निर्मिती केली जाते. यामुळे जिल्ह्यातील गूळ उत्पादनावर परिणाम होत आहे. अशा भेसळयुक्त गुळावर कारवाई करा, अशी मागणी श्री शाहू गूळ उत्पादक शेतकरी संघटनेच्या वतीने पालकमंत्री सतेज पाटील यांच्याकडे केली. शुक्रवारी या मागणीचे निवेदन त्यांना देण्यात आले. याप्रश्नी सोमवारी बैठक घ्या, असे आदेश पाटील यांनी जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांना दिले.
कोल्हापूरचा गूळ संपूर्ण जगात प्रसिद्ध आहे. कोल्हापूरच्या बाजार समितीत एक सप्टेंबर ते गुढी पाडव्यापर्यंत आवक होणार्या गुळाला कोल्हापुरी गूळ म्हटले जाते. मात्र, गेली तीन वर्षे हंगाम सोडून जिल्ह्यात अनैसर्गिक गुळाची निर्मिती होत आहे. हा गूळ निर्माण करण्यासाठी कर्नाटकातून अपरिपक्व ऊस आणला जातो. त्यात केमिकलयुक्त साखर व रंगाचा वापर केला जातो.कर्नाटकातही याच पद्धतीने गुळाची निर्मिती करून कोल्हापूर आणि सांगलीच्या बाजारपेठेत त्याची कोल्हापुरी गुळाचे लेबल लावून विक्री केली जाते, असे या निवेदनात म्हटले आहे.
संबंधित गूळनिर्मिती करणार्यांबरोबर खरेदी करणारे व्यापारी आणि बाजार समिती यांच्यावरही कारवाई करावी, अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. यावेळी संघटनेचे अध्यक्ष विजय जाधव, केवलसिंग रजपूत, अमित पाटील, अजित पाटील, सचिन पाटील, युवराज पाटील, धनाजी पाटील आदी उपस्थित होते. याप्रश्नी सोमवारी अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अधिकार्यांसमवेत बैठक घ्या, असे आदेश पालकमंत्री पाटील यांनी दिले.