काँग्रेसचं चांगभलं : अण्णांच्या माघारी आता जयश्री जाधवांची जबाबदारी !

काँग्रेसचं चांगभलं : अण्णांच्या माघारी आता जयश्री जाधवांची जबाबदारी !
Published on
Updated on

कोल्हापूर; सतीश सरीकर 

संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीत अखेर काँग्रेसने बाजी मारली. गत निवडणुकीपेक्षा जास्त मते मिळवीत काँग्रेसच्या जयश्री जाधव यांनी विजयी गुलाल उधळला. जयश्री जाधव यांनी कोल्हापूरच्या पहिल्या महिला आमदार होण्याचा मान मिळविला.

महाविकास आघाडीतील शिवसेनेची काँग्रेसला खंबीर साथ मिळाली. कोल्हापूरच्या रणसंग्रामात भाजपची जादू चालली नाही. तुल्यबळ लढतीत सत्यजित कदम यांच्या पराभवामुळे भाजपला धक्का बसला आहे. 'अण्णांच्या माघारी… आता आपली जबाबदारी…' या भावनिक टॅगलाईनचे कोल्हापूरकरांनी विजयात रूपांतर करून महाविकास आघाडीची पाठराखण केली. दुसरीकडे, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना होमपिचवरच पराभव स्वीकारावा लागल्याने हा पराभव कार्यकर्त्यांच्या जिव्हारी लागला आहे. शिवसेनेच्या बाणाने भाजपचा अचूक वेध घेतल्याचे निवडणूक निकालावरून दिसत आहे. पालकमंत्री सतेज पाटील यांच्यासह महाविकास आघाडीची नेतेमंडळी विजयाची शिल्पकार ठरली.

आ. चंद्रकांत जाधव यांच्या निधनामुळे पोटनिवडणूक झाली. 2019 मध्ये काँग्रेसकडून लढताना आ. जाधव यांना 91 हजार 53 मते मिळाली होती. शिवसेना-भाजप युतीचे उमेदवार क्षीरसागर यांना 75 हजार 854 मते पडली होती. क्षीरसागर हे 15 हजार 199 मतांनी पराभूत झाले होते. यंदा महाविकास आघाडीच्या वतीने काँग्रेसकडून श्रीमती जाधव रिंगणात उतरल्या होत्या. तर भाजपकडून सत्यजित कदम मैदानात होते. जाधव यांनी तब्बल 97 हजार 332 मते मिळविली. कदम यांना 78 हजार 25 मतांवर समाधान मानावे लागले. पती चंद्रकांत जाधव यांच्यापेक्षा श्रीमती जाधव यांनी जास्त मताधिक्याने विजय संपादन केला. त्यांनी 19 हजार 307 मतांनी कदम यांना पराभवाचा धक्का दिला आहे. महाविकास आघाडीतील सर्व पक्षांच्या एकजुटीचा हा विजय असल्याचे आकडेवारीवरून दिसते. हिंदुत्वाच्या मुद्द्यावर नाराज शिवसैनिकांची मते वळविण्याचा भाजपचा प्रयत्न मात्र अयशस्वी ठरला.

काँग्रेसची विजयी घोडदौड

कोल्हापूर उत्तर मतदारसंघ हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. सातपैकी पाचवेळा या ठिकाणी शिवसेनेने विजयी झेंडा फडकावला आहे. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असल्याने या जागेवर काँग्रेसचाच हक्क असल्याचे सांगून पालकमंत्री सतेज पाटील यांनी जयश्री जाधव यांच्यासाठी उमेदवारी मिळविली. सुरुवातीपासूनच सूक्ष्म नियोजन करून प्रचारासह सोशल मीडियात आघाडी घेतली. शिवसैनिकांनाही व्यासपीठावर सन्मानाची वागणूक दिली. शिवसेना व राष्ट्रवादीसह मित्रपक्षांच्या कार्यकर्त्यांना सोबत घेऊन नियोजनबद्ध प्रचाराची धुरा सांभाळली. शिवसेनेच्या पाठिंब्यामुळे काँग्रेसचे पारडे जड झाल्याने पोटनिवडणुकीत जाधव यांची सरशी झाली. या निकालामुळे काँग्रेसची जिल्ह्यावरील पकड मजबूत झाली आहे.

महाविकास आघाडीचा वरचष्मा

राष्ट्रवादीचे आ. भारत भालके यांचे निधन झाल्याने पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघात पोटनिवडणूक झाली. त्यात महाविकास आघाडीच्या वतीने भालके यांचे पुत्र भगीरथ यांना रणांगणात उतरविण्यात आले होते. परंतु, भाजपने हा मतदारसंघ खेचून घेत विजय मिळविला. भाजपचे समाधान औताडे या ठिकाणी विजयी झाले. नांदेडमधील देगलूर मतदारसंघाचीही पोटनिवडणूक झाली. त्या ठिकाणी मात्र काँग्रेसच्या जितेश अंतापूरकर यांनी महाविकास आघाडीच्या वतीने लढतीत विजय मिळविला. त्यानंतर कोल्हापूर उत्तर पोटनिवडणुकीकडे राज्याचे लक्ष लागले होते. उपमुख्यमंत्री अजित पवार, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह राज्यातील दिग्गज नेतेमंडळींनी कोल्हापूरच्या रणांगणात प्रचारसभांत आरोपांच्या तोफा डागल्या होत्या. अखेर काँग्रेसने भाजपला पराभूत करून राज्यात महाविकास आघाडीचाच वरचष्मा असल्याचे सिद्ध केले.

शिवसेनेने शब्द राखला! 

कोल्हापूर : कोल्हापूर उत्तर मतदारसंघ हा शिवसेनेचा बालेकिल्ला असल्याने शिवसेनेने जागेवर दावा केला होता. परंतु, महाविकास आघाडीचे सरकार असल्याने राज्यात चुकीचा संदेश जाईल, अशी भूमिका पालकमंत्री पाटील यांनी घेतली. चर्चेच्या गुर्‍हाळानंतर शिवसेना पक्षप्रमुख व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काँग्रेसच्या उमेदवार जाधव याच महाविकास आघाडीच्या उमेदवार असतील, असे जाहीर केले. त्यानंतर शिवसैनिकही काँग्रेस उमेदवाराच्या प्रचारासाठी मैदानात उतरले. शिवसेनेचे पाठबळ मिळाल्याने काँग्रेसच्या जयश्री जाधव यांना मताधिक्य मिळाले. मुख्यमंत्री ठाकरे यांचा शब्द शिवसैनिकांनी राखला. शिवसेनेचा प्रभाव असलेल्या शुक्रवार पेठ, शाहू उद्यान, छत्रपती शिवाजी चौक, सिद्धार्थनगर, जुना बुधवार, पंचगंगा तालीम, खोलखंडोबा, तोरस्कर चौक आदी भागांत काँग्रेसला मताधिक्य मिळाले.

…म्हणून भाजप बॅकफूटवर? 

कोल्हापूर : निवडणूक जाहीर झाल्यानंतर कदम यांची उमेदवारी जाहीर करून भाजपने आघाडी घेतली होती. पहिल्या टप्प्यात सर्वत्र भाजपची हवा होती. परंतु, भाजप नेत्यांच्या वादग्रस्त वक्तव्यांचा त्यांना फटका बसल्याचे सांगण्यात येत आहे. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापुरात तीन लाख कार्यकर्ते प्रचारासाठी येतील, असे जाहीर केले. तसेच महाविकास आघाडीकडून मतांसाठी ऑनलाईन परस्पर मतदारांच्या खात्यात पैसे ट्रान्स्फर झाल्यास 'ईडी' चौकशी करू शकते, असे सांगून हाबकी डाव टाकण्याचा प्रयत्न केला. चित्रा वाघ यांच्या सभेतील दगडफेक व त्यानंतर झालेल्या आरोप-प्रत्यारोपांनंतर तणाव निर्माण झाला. त्याचा फटका भाजपला बसल्याचे दिसत आहे. त्याबरोबरच हिंदुत्वाच्या मुद्द्यावर नाराज शिवसैनिकांची मते भाजपच्या पारड्यात पडतील, ही अपेक्षा फोल ठरली.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news