कोल्हापूर : निवडणुकीला भावनिक किनार!

जयश्री जाधव
जयश्री जाधव
Published on
Updated on

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : टोकाची ईर्ष्या, आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी, महाविकास आघाडी आणि भाजपने पणाला लावलेली प्रतिष्ठा, यामुळे कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक गाजली. मात्र, या निवडणुकीला भावनिक किनार लाभली होती.

कोल्हापूर उत्तर मतदारसंघाच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार चंद्रकांत जाधव विजयी झाले. मात्र, त्यांचे आकस्मिक निधन झाले आणि या जागेची पोटनिवडणूक जाहीर झाली. जाधव यांच्या पत्नी जयश्री जाधव यांना महाविकास आघाडीने उमेदवारी दिली. भाजपने प्रतिस्पर्धी म्हणून सत्यजित कदम यांना रिंगणात उतरवले. यांच्यासह एकूण 15 उमेदवार निवडणूक रिंगणात राहिले. मात्र, महाविकास आघाडी आणि भाजप यांच्यातच खरी लढत झाली.

चंद्रकांत जाधव यांनी अल्पावधीतच आपल्या कामाच्या कार्यपद्धतीवरून लोकांत वेगळी ओळख निर्माण केली होती. शहरातील अगदी बारीकसारीक प्रश्नांबाबत असलेली त्यांची तळमळ वारंवार दिसून यायची. अगदी शहरातील गटारी स्वच्छतेबाबत ते दोन-तीन तास महापालिकेच्या मुकादमांसमवेत बैठक घ्यायचे. यामुळे अण्णांच्या कामाविषयी आणि त्यांच्या सपंर्काविषयी लोकांत वेगळीच भावना निर्माण झाली होती. महाविकास आघाडीच्या पहिल्याच मेळाव्यात जयश्री जाधव यांना अश्रू अनावर झाले होते. यानंतर या निवडणुकीला वेगळीच भावनिक किनार लाभली. चंद्रकांत जाधव यांच्या आठवणी, त्यांच्याविषयी असलेल्या भावना आणि जयश्री जाधव यांची उमेदवारी याची निवडणुकीत अनेक अंगाने चर्चा होत गेली. यामुळे जयश्री जाधव यांना मतदारांची सहानभूती असल्याचे प्रचारादरम्यान अनेक ठिकाणी दिसून आले. सोशल मीडियातूनही प्रसारित विविध व्हिडीओ, संदेश यामुळे या निवडणुकीत भावनिकतेचेही दर्शन घडले.

जयश्री जाधव यांची 'बिचारी' अशी इमेज करण्याचा प्रयत्न झाला. मात्र, जाधव यांनी आपण बिचारी नाही, खंबीर असल्याचेच दाखवून दिले. पती निधनाचे दु:ख बाजूला सारून, या दु:खाचे ओझे खांद्यावर घेत, त्यांनी रणरागिणी ताराराणींच्या कोल्हापुरात करारी बाण्याचेही दर्शन यानिमित्ताने घडवले. यामुळे चुरस, संघर्ष, ईर्ष्या असूनही निवडणुकीशी भावनिकताही जोडली गेली.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news