कोल्हापूर : प्रचार मुद्द्यावरून व्यक्तिगत पातळीवर घसरला! | पुढारी

कोल्हापूर : प्रचार मुद्द्यावरून व्यक्तिगत पातळीवर घसरला!

कोल्हापूर; प्रवीण मस्के : कोल्हापूर उत्तर पोटनिवडणूक जाहीर झाल्यापासून प्रचार संपेपर्यंत स्थानिक ते राज्य पातळीवरील नेत्यांनी परंपरेप्रमाणे एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांची चिखलफेक केली. विकासाच्या मुद्द्यावरून थेट व्यक्तिगत पातळीवरील टीकेने लोकशाहीतील निवडणुकीचा उत्सव अनुभवणार्‍या मतदारांची चांगलीच करमणूक झाली. मात्र, अखेरपर्यंत स्थानिक प्रश्नांवर चर्चा झाली नसल्याने मतदारांना काही ठोस ‘उत्तर’ मिळाले नाही.

आ. चंद्रकांत जाधव यांच्या निधनानंतर सुरुवातीला अलिखित नियमाप्रमाणे ही निवडणूक बिनविरोध होईल, अशी अपेक्षा होती. परंतु, राजकीय नेत्यांच्या बिनविरोधच्या हालचालींना सुरुंंग लागला. शिवसेना व काँग्रेसने जागेवर दावा केला. अखेर आघाडी धर्म पाळत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ‘उत्तर’ची जागा काँग्रेसलाकोल्हापूर सोडली. त्यानंतर भाजपनेही उमेदवार जाहीर करीत रणशिंग फुंकले. काँग्रेसच्या उमेदवार जयश्री जाधव यांनी भावनिकतेची किनार म्हणून साधेपणाने, तर भाजपचे उमेदवार सत्यजित कदम यांनी जोरदार शक्तिप्रदर्शनाने अर्ज दाखल केला. निवडणुकीत 15 उमेदवार होते; परंतु खरी लढत महाविकास आघाडी विरुद्ध भाजप अशीच पाहायला मिळाली.

‘उत्तर’ची पोटनिवडणूक मिसळ पे चर्चा, चाय पे चर्चा, कटवडा पे चर्चा, कोपरा सभा यांनी कमालीची चुरशीची झाली. सुरुवातीपासून राजकीय नेते कोल्हापुरात ठाण मांडून बसल्याने राजकीय ईर्ष्या टोकाला गेली. त्यांच्या दिमतीला राज्य पातळीवरील नेते उतरल्याने निवडणुकीत रंगत आणली. पालकमंत्री पाटील यांनी कोट्यवधी रुपयांचा कर चुकविला, महापालिका त्यांच्यावर कारवाईस घाबरते. ज्यांनी जनतेवर टोल लादला त्यांना मते मागण्याचा अधिकार नाही, असा आरोप आ. चंद्रकांत पाटील यांनी प्रचारादरम्यान केला. यास पालकमंत्री सतेज पाटील यांनी जशास तसे उत्तर दिले. चंद्रकांत पाटील अपरिपक्व असल्याचे सांगत आपण कर चुकविला असता; तर विधान परिषद निवडणुकीत अर्ज अपात्र झाला असता, याची आठवण त्यांना करून दिली.

आ. चंद्रकांत पाटील यांनी प्रचारसभेत थेट पाईपलाईनचे काय झाले. हे पाणी अंघोळीसाठी नाही पिण्यासाठी आहे, असा सवाल ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांना केला. भाजप सरकारच्या काळात परवानग्या नाकारण्यात आल्या. कोरोनामुळे वर्षभर काम बंद राहिले. त्यामुळे थेट पाईपलाईनचे पाणी देण्यास उशीर झाला. यंदाच्या दिवाळीचे अभ्यंगस्नान नागरिक थेट पाईपलाईनच्या पाण्याने करतील. अंघोळीचे की पिण्याचे पाणी, यावरून चंद्रकांत पाटील यांनी आपले अज्ञान प्रकट करू नये, असा टोला मंत्री मुश्रीफ यांनी लगावला.

पालकमंत्री यांनी शहराची हद्दवाढ करणार असल्याचे वक्तव्य सभेत केले. यावर आ. चंद्रकांत पाटील यांनी ही पोटनिवडणुकीपर्यंतची केवळ घोषणा असल्याची टीका केली. भाजपच्या महिला आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ यांच्या पतीच्या नाशिकमधील गैरव्यवहाराबाबत पालकमंत्री पाटील यांनी भाष्य केले. चित्रा वाघ यांनी पोटनिवडणुकीशी पतीचा काहीही संबंध नाही. तुम्ही सत्तेची ताकद बलात्कारी, गुन्हेगारांवर वापरा, अशी घणाघाती टीका केली. भावनिक नको, विकासाच्या मुद्द्यावर बोला, असे म्हणत नेत्यांकडून शेवटच्या क्षणापर्यंत प्रचाराचा धुरळा उडतच राहिला.

विकासाच्या प्रश्नांना सोयीस्कर बगल

कोल्हापूर उत्तरच्या पोटनिवडणुकीत नेत्यांकडून भावनिकता, विकासकामे, व्यक्तिगत आरोप केले गेले. प्रत्यक्षात रखडलेली थेट पाईपलाईन योजना, महापूर उपाययोजना, शाहू मिलच्या जागेवर गारमेंट पार्क, शहरातील रस्ते, उड्डाणपूल, आयटी पार्क, वाढलेली महागाई, बेरोजगारी याचे ‘उत्तर’ तसेच राहिले. जनतेला विकासाचे स्वप्न दाखवत नेहमीप्रमाणे नेत्यांनी राजकीय व्यासपीठावरून वेळ मारून नेली.

Back to top button