कोल्हापूर : निवडणुकीसाठी कोट्यवधी खर्च! | पुढारी

कोल्हापूर : निवडणुकीसाठी कोट्यवधी खर्च!

कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा : निवडणूक आयोगाने पोटनिवडणुकीतील खर्चाची मर्यादा स्पष्ट केली आहे; पण प्रत्यक्षात कार्यकर्त्यांना सांभाळताना हा खर्च काही कोटींच्या घरात गेला आहे. कोणी जेवणावळी घालून, तर कोणी कुपन देऊन मतदारांना आपलेसे करण्याचा प्रयत्न केल्याची चर्चा आहे. प्रत्यक्षात याचे मतांमध्ये किती रूपांतर झाले, हे आजच्या निकालातून स्पष्ट होणार आहे.

पोटनिवडणूक बिनविरोध करण्याच्या हालचाली सुरू होत्या. पालकमंत्री सतेज पाटील यांनी यासाठी भाजप नेत्यांशी चर्चा केली; पण जयश्री जाधव यांनी काँग्रेस पक्षातून निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला. यानंतर भाजपने सत्यजित कदम यांना उमेदवारी दिली. अडीच वर्षांसाठीचा कालावधी मिळणार असला, तरी राजकीय पक्षांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली. त्याचबरोबर या निवडणुकीला भावनिक किनारही लाभली. दोन्ही पक्षांच्या उमेदवारांकडे कार्यकर्त्यांची संख्या मोठी आहे. निवडणूक आयोगाने रोजच्या खर्चाला मर्यादा दिल्या असल्य, तरी प्रत्यक्षात कोट्यवधी रुपये खर्च झाल्याची चर्चा आहे.

जेवणावळी, गठ्ठा मतांवर नजर ठेवून केलेला खर्च, तर काही ठिकाणी कुपन वाटले गेल्याची चर्चा आहे. मतदारांना आपलेसे करण्याच्या नादात पैसे वाटताना काही कार्यकर्त्यांवर कारवाईही झाली; पण काही ठराविक भागांत लक्ष्?मी दर्शनानंतरच मतदार मतदानासाठी बाहेर पडल्याची चर्चा आहे.

Back to top button