कोल्हापूर : शिस्तबद्ध पोलिस बँडच्या तालावरील करवीरचे राज्यगीत, हिरे माणके-सोने उधळा जय-जयकार करा, जय राजर्षी शाहू राजा तुजला मुजरा... या व अशा शाहूस्फूर्ती गीतांचा ताल, पारंपरिक लोककलांची पथके, राजर्षींच्या दूरद़ृष्टींच्या लोकोपयोगी कार्यावर प्रकाशझोत टाकणारे चित्ररथ, त्यांच्या जीवनकार्यावरील सजीव देखावे, रणहलगी-तुतारी व ढोल-ताशाचा गजर आणि राजर्षींचा अखंड जयघोष अशा उत्साही वातावरणात गुरुवारी शोभायात्रा व समता दिंडी काढण्यात आली. रिमझिम पावसाच्या उपस्थितीत मिरवणुकीचा उत्साह द्विगुणीत झाला होता. दरम्यान, दसरा चौकातील राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादनासाठी दिवसभर अखंड रीघ लागली होती.
लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या 151 वा जयंती सोहळा दि. 26 जून रोजी सर्वत्र उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्ताने कोल्हापुरातील ऐतिहासिक दसरा चौकातून भव्य शोभायात्रा काढण्यात आली. राजर्षी शाहू महाराज यांचा जन्मदिवस ‘सामाजिक न्याय दिन’ म्हणून साजरा होतो. यानिमित्ताने जिल्हा प्रशासन व सहायक आयुक्त समाजकल्याण विभागाच्या वतीने दसरा चौकातून समता दिंडीसह विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले.
ऐतिहासिक दसरा चौकात इसवी सन 1927 मध्ये छत्रपती राजाराम महाराज यांनी राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचे भव्य स्मारक उभारले. या स्मारकास अभिवादनाने समता दिंडीचे उद्घाटन झाले. यावेळी पालकमंत्री प्रकाश आबिटकर, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, खासदार शाहू महाराज, आमदार जयंत आसगावकर, शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के, राहुल पाटील, जिल्हाधिकारी अमोल येडगे, आयुक्त के. मंजुलक्ष्मी, जिल्हा पोलिस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस., समाजकल्याण विभागाचे सहायक आयुक्त सचिन साळे, संभाजी पोवार, सुनीता नेर्लीकर, सुवर्णा सावंत, विद्या किरवेकर, तृतीयपंथी प्रतिनिधी मयुरी आळवेकर जिल्हा क्रीडा अधिकारी विद्या शिरस, ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार, मराठा महासंघाचे वसंतराव मुळीक, आर. के. पोवार, मुस्लिम बोर्डिंगचे गणी आजरेकर, आदिल फरास, कादर मलबारी, केएसएचे सचिव माणिक मंडलिक, छत्रपती चॅरिटेबल ट्रस्टचे अॅड. राजेंद्र चव्हाण, माणिक पाटील-चुयेकर, प्रा. विनय पाटील, कॉ. दिलीप पवार, पै. विष्णू जोशीलकर, यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर, शासकीय विभागांचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
जिल्हा समाजकल्याण कार्यालयामार्फत चित्ररथांमध्ये राजर्षी शाहूंच्या लोकोपयोगी कार्यावर आधारित सजीव देखावे साकारले होते. पारंपरिक वेशभूषा परिधान केलेल्या मुला-मुलींनी शाहू चरित्रातील प्रसंगांना उजाळा दिला. यात महिला सबलीकरण, खेळांना प्रोत्साहन, व्यवसाय शिक्षण, सर्व जाती-धर्मीय एकोपा आदी विषयांचा समावेश होता. आधुनिक युगातील विविध समस्यांवर भाष्य करणारे देखावेही दिंडीत साकारण्यात आले होते. क्रीडानगरी कोल्हापूरचा वारसा सांगणार्या चित्ररथात कुस्ती, फुटबॉलसह विविध खेळाडू व त्यांच्या खेळाशी निगडित वेशभूषा करून सहभागी झाले होते. जिल्हा प्रशासन व सहायक आयुक्त समाजकल्याण कार्यालयाद्वारे आयोजित समता दिंडीसाठी विविध विभागांनी सहभाग घेतला. यावेळी विविध शाळांचे हजारो विद्यार्थी, खेळाडू, शाहूप्रेमी नागरिक उपस्थित होते.
दसरा चौकातून दोन मार्गांवरून दोन दिंड्या निघाल्या. शहरातील विविध मार्गांवरून निघालेल्या दिंडींचा समारोप बिंदू चौकात झाला. दिंडीत विद्यार्थ्यांनी शिवकालीन युद्धकला (मर्दानी खेळ), झांज, ढोल-ताशा, लेझीम आदी कलाप्रकार सादर केले. दिंडीत एनसीसी, एनएसएस, स्काऊट गाईडचे विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. राजर्षी शाहू महाराजांसह विविध ऐतिहासिक वेशभूषेत उपस्थित मुलांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले.