

कोल्हापूर : राज्य शासनाने अंशतः अनुदानित शाळांना अनुदानाचा वाढीव टप्पा द्यावा, या मागणीसाठी मुंबईतील आझाद मैदानावर शिक्षक समन्वय संघातर्फे सुरू असलेल्या आंदोलनास पाठिंबा म्हणून जिल्ह्यातील 140 अंशतः अनुदानित शाळा बुधवारी बंद होत्या. विद्यार्थ्यांना अघोषित सुट्टी मिळाल्याने शाळांमधील किलबिलाट शांत होता.
बुधवारी मंत्री गिरीश महाजन यांनी मुंबई येथे आंदोलकांची भेट घेऊन चर्चा केली. यात सकारात्मक चर्चा झाली. अंशतः विनाअनुदानित शाळांना वाढीव टप्प्याचा निधी देण्याचा शब्द राज्य सरकारने दिल्याने शिक्षकांनी आंदोलन स्थगित केले आहे. गुरुवारपासून या शाळा पूर्ववत सुरू होणार आहे.
10 ऑक्टोबर 2024 रोजी मंत्रिमंडळ बैठकीत विना तथा अंशतः अनुदानित शाळांना अनुदानाचा वाढीव टप्पा देण्याचा निर्णय झाला होता. शासन निर्णयही झाला होता. मात्र, कोणत्याच अधिवेशनात या शाळांसाठी लागणार्या निधीची तरतूद झाली नाही. त्यामुळे मंगळवार व बुधवार असे दोन दिवस जिल्ह्यातील 140 शाळा बंद ठेवून शिक्षक मुंबई येथील आझाद मैदानातील आंदोलनात सहभागी झाले होते. विनाअनुदानित शिक्षकांच्या मागण्या मान्य झाल्याशिवाय मागे न हटण्याचा निर्धार शिक्षक समन्वय संघाने घेतला होता. राज्यातील 25 हजार शिक्षकांनी एल्गार केल्याने सरकारने एक पाऊल मागे घेत त्यांना निधीची तरतूद केली. त्यामुळे हे आंदोलन मागे घेण्यात आले आहे.
या आंदोलनाची दमदार सुरुवात कोल्हापुरातून झाली. पालकमंत्र्यांच्या घरावर पायी दिंडी, साखळी उपोषण, रास्ता रोको, लोकप्रनिधींना निवेदने, शाळा बंद अशी आंदोलने उभा केली. राज्यभरातील विनाअनुदानित शाळांमधील शिक्षकांनीही त्यांच्या जिल्ह्यात आंदोलने सुरू केली. यामुळेच सरकारने अधिवेशन संपण्यापूर्वी निधीची तरतूद करण्याचा शब्द दिला आहे.