कोल्हापूर : कोल्हापूर शहरात राज्य नगरोत्थान योजनेंतर्गत 100 कोटी निधीतून सुरू असलेल्या 16 रस्त्यांपैकी 14 रस्त्यांची कामे सुरू आहेत. त्यापैकी 6 रस्त्यांची कामे 90 टक्के, तर 7 रस्त्यांची कामे 70 टक्के पूर्ण झाली आहेत. एका रस्त्याचे काम सुरू केले असून, 25 टक्के झाले आहे. भूसंपादनाच्या समस्येमुळे 2 रस्त्यांची कामे सुरू झालेली नाहीत. त्यापैकी रसिका हॉटेल ते जाधववाडी रिंग रोड हा रस्ता पुढील आठवड्यापासून सुरू करण्यात येणार आहे, अशी माहिती महापालिकेच्या वतीने कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये पूर्तता अहवालाद्वारे सादर करण्यात आली.
कोल्हापूर शहरातील रस्त्यांविषयी सर्किट बेंचमध्ये जनहित याचिका दाखल आहे. 4 डिसेंबर रोजी झालेल्या सुनावणीत न्यायालयाने महापालिकेला रस्ते कामाचा पूर्तता अहवाल सादर करण्याचा आदेश दिला होता. कोल्हापूर शहरात सुरू असलेल्या रस्ते कामाचा पूर्तता अहवाल महापालिकेच्या वतीने अॅड. अभिजित आडगुळे यांनी न्यायमूर्ती मकरंद कर्णिक व न्यायमूर्ती अजित कडेठाणकर यांच्यासमोर सादर केला. महापालिकेचे शहर अभियंता रमेश मस्कर यांनी प्रतिज्ञापत्र सादर केले.
राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रमअंतर्गत 1.5 कोटी रुपयांच्या रिंगरोडचे काम सुरू आहे. तसेच परीख पूल अँप्रोच काँक्रीट रोडचे काम सुरू आहे असून, त्याचा खर्च अंदाजे 2.5 कोटी रुपये आहे. जिल्हा नगरोत्थान योजनतून 18 मीटर डी.पी. रस्त्याचे 1.65 कोटींचे काम प्रगतिपथावर आहे. केएमसीने रस्त्यांशी संबंधित कामासाठी स्वनिधीतून 8 कोटी रुपये निधी उपलब्ध केला आहे. त्यापैकी 2 कोटी रुपयांचे काम जवळजवळ पूर्ण झाले आहे. आणखी एक कोटी रुपयांचे काम प्रगतिपथावर आहे. त्यातून भाड्याने घेतलेल्या ड्रम मिक्स प्लांटचा वापर करून मोठे पॅचवर्क केले जात आहे. त्याव्यतिरिक्त 2 कोटी रुपये आधीच विविध रस्ते दुरुस्तीच्या कामांसाठी वापरले आहेत. उर्वरित 2 कोटी रुपये आगामी रस्ते प्रकल्पांच्या नियोजनासाठी वाटप करण्यात आले आहेत. या प्रकल्पांव्यतिरिक्त दलित वस्ती योजना आणि दलितेतर योजना, नगरोत्थान जिल्हा स्तरावरील सुमारे 40 कोटी रुपयांच्या कामांची निविदा प्रक्रिया सुरू आहे.
100 कोटींतून 16 रस्त्यांची कामे सुरू
त्यापैकी 14 रस्त्यांची कामे प्रगतिपथावर
6 रस्त्यांचे 90 टक्के काम पूर्ण
7 रस्त्यांचे 70 टक्के काम पूर्ण
एक रस्ता 25 टक्के टप्प्यावर
भूसंपादनामुळे 2 रस्त्यांची कामे सुरू नाहीत
रसिका हॉटेल-जाधववाडी रिंगरोडचे काम पुढील आठवड्यात सुरू
एकूण रस्त्यांची लांबी 19 कि.मी.; त्यापैकी 13.5 कि.मी.वर प्रत्यक्ष काम सुरू
राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रमांतर्गत 0.75 कि.मी.चे काम सुरू
जिल्हा नगरोत्थान योजनेतून 0.60 किमीचे काम प्रगतीत
6 रस्त्यांच्या फिनिशिंगचे काम शिल्लक; एक महिन्यात पूर्ण होणार
7 रस्त्यांवरील बीसीचा अंतिम थर शिल्लक
2 कोटींचे पॅचवर्क पूर्ण; 1 कोटींचे पॅचवर्क सुरू
पूर्वी 2 कोटी खर्च; उर्वरित 2 कोटी आगामी प्रकल्पांसाठी राखीव
मोठ्या पॅचवर्कसाठी 2 कोटींचा बॅच-मिक्स प्लांट भाड्याने घेतला
परीख पूल अॅप्रोच काँक्रीट रोड पूर्ण होण्यासाठी दीड महिना लागणार
अतिक्रमण व कचरा हटवण्यासाठी महापालिकेची व्यापक मोहीम सुरू
कोल्हापूर शहरात सुरू असलेल्या 16 रस्त्यांची लांबी सुमारे 19 किलोमीटर इतकी आहे. त्यापैकी 13.5 कि.मी.चे काम सुरू आहे. राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रमअंतर्गत 0.75 कि. मी. चे काम सुरू आहे. जिल्हा नगरोत्थान योजनेंतर्गत 0.60 कि. मी. इतके काम सुरू आहे. सर्व 16 रस्ते डांबरीकरण करून केले जातील. सहा रस्त्यांच्या फिनिशिंगचे काम शिल्लक असून, एक महिन्यात ही कामे पूर्ण होतील. सात रस्त्यांची कामे बीसीच्या (बिटुमिनस काँक्रीट) शेवटच्या थराचे काम अपूर्ण असून, तीन महिन्यांत पूर्ण करण्यात येतील.
भूसंपादन प्रक्रिया प्रलंबित असल्याने उर्वरित 2 रस्त्यांचे काम सुरू झालेले नाही. राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रमअंतर्गत सुरू असलेल्या बिटुमिनस काँक्रीटचे दोन थर शिल्लक असून, महिन्यात पूर्ण होईल. परीख पूल काँक्रीट रस्ता पूर्ण होण्यासाठी दीड महिना कालावधी लागेल. जिल्हा नगरोत्थान योजनेंतर्गत कामाच्या बिटुमिनस काँक्रीटचा एक थर शिल्लक असून, त्यासाठी 15 दिवस आवश्यक आहेत. या रस्त्यांव्यतिरिक्त 2 कोटी रुपयांचे पॅचवर्कचे काम जवळजवळ पूर्ण झाले आहे. तसेच पुढील पॅचवर्कसाठी 2 कोटी रुपयांचा एक नवीन बॅच-मिक्स प्लांट भाड्याने घेतला आहे, असेही पूर्तता अहवालात म्हटले आहे.
सर्किट बेंचच्या आदेशानुसार महापालिकेने महत्त्वाच्या रस्त्यांवरील सर्व कचरा, अतिक्रमणे आणि पदपथांना अडथळा आणणारी अतिक्रमणे हटविण्यासाठी व्यापक मोहीम सुरू केली आहे. त्या मोहिमेचा सविस्तर आराखडा तयार करून महापालिकेच्या वेगवेगळ्या चार विभागीय कार्यालयांतर्गत नियमितपणे ही मोहीम सुरू ठेवण्यात येईल, असेही पूर्तता अहवालात म्हटले आहे.