कोल्हापूर : रेल्वेस्थानक घुशींनी पोखरला, मालवाहतूक रेल्वेचा डबा पुन्हा घसरला, तीन महिन्यातील दुसरी घटना | पुढारी

कोल्हापूर : रेल्वेस्थानक घुशींनी पोखरला, मालवाहतूक रेल्वेचा डबा पुन्हा घसरला, तीन महिन्यातील दुसरी घटना

कोल्हापूर; पुढारी ऑनलाईन : कोल्हापूर येथील मार्केट यार्डात मालवाहतूक रेल्वेचा डबा घसरल्याची माहिती समोर आली आहे. सकाळी ७ च्या दरम्यान मालवाहतूक रेल्वे गोडावूनला खाली करण्यासाठी मागे घेताना अचानक रुळावरून घसरली. यामध्ये कोणतीही जिवीतहानी झाली नसल्याची प्राथमिक माहिती आहे.

मालवाहतूक होणाऱ्या रुळाखालील जमीन घुशींनी पोखरल्याने जमीन भुसभुशीत झाली आहे. यामुळे अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे. मागच्या तीन महिन्यांपुर्वी असाच अपघात झाला होता. गेल्या ३ महिन्यांतील रुळावरुन रेल्वेगाडी घसरण्याची ही दुसरी घटना आहे. मालवाहतूक होणाऱ्या रेल्वेरूळाच्या समस्येवर प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने हा प्रकार घडल्याचे बोलले जात आहे.

कोल्हापूर : ६ डिसेंबरच्या घटनेच्या आठवणींना उजाळा

रेल्वे स्थानकात रेल्वे डब्याला आग लागल्याची घटना ताजी असतानाच काही तासांतच मार्केटयार्डमधील रेल्वे गुड्समध्ये मालगाडीतील सिमेंट पोती उतरताना एक बोगी उलटल्याची घटना घडली होती. यात सहा हमाल जखमी झाले. त्यातील तिघे गंभीर जखमी झाले होते.

सिमेंट पोत्यांनी भरलेल्या मालवाहू रेल्वेच्या सात बोगी ६ डिसेंबरच्या मध्यरात्री मार्केट यार्डमधील रेल्वे गुडस्च्या क्रमांक तीनच्या धक्क्यावर दाखल झाल्या होत्या. ठेकेदार राजू हुंडेकर याच्याकडील सुरेश सांदुगडे, सिराज आदालखानसह १० माथाडी कामगार बोगीतील सिमेंटची १ हजार ३९७ पोती उतरून घेत होते. ९०० सिमेंटची पोती उतरल्यानंतर अचानक बोगीच्या चाकाजवळील असणारे लॉक तुटले आणि क्षणार्धात ५० ते ६० टन वजन क्षमतेची बोगी उजव्या बाजूला कलंडली होती.

Back to top button