

कासारवाडी : पुढारी वृत्तसेवा : हातकणंगले तालुक्यातील कासारवाडी येथील गायरान गट नंबर ६३० मधील केलेल्या उत्खननासंदर्भात १३ जणांना १४४ कोटींचा दंड ठोठावण्यात आला आहे. त्यासंबंधीच्या नोटीसा तहसीलदार सुशील बेल्हेकर यांनी संबंधितांना पाठवल्या आहेत.
कासारवाडी गायरान गट नंबर ६३० १/अ व ६३० १/ब वन जमिनीमध्ये केंद्र शासनाच्या परवानगीशिवाय ८८ हजार ५५१ ब्रास अतिरिक्त विनापरवाना गौण खनिजाचे उत्खनन केले आहे. यामुळे मौजे कासारवाडी गावच्या हद्दीतील पर्यावरणाच्या नुकसान भरपाईची १४४ कोटी २२ लाख १७ हजार ४८५ इतकी रक्कम उत्खनन करणाऱ्या १३ जणांकडून वसूल करण्यात येणार आहे. सदरची रक्कम सात दिवसांत न भरल्यास त्यांच्या मालमत्तेवर बोजा चढवण्याचे तहसीलदार सुशील बेलेकर यांनी नोटीसाद्वारे कळवण्यात आले आहे.
या परिसराततील नागरिकांना होणारा अवैध उत्खननाचा त्रास आणि पर्यावरणाची हानी यासाठी अनेक वेळा नागरिकांनी वेगवेगळ्या माध्यमातून लढा दिला होता. यासंबंधीची तक्रार कासारवाडी नागरिकांनी हरित लवादाकडे केली होती.