कोल्हापूर ; पुढारी वृत्तसेवा : विज्ञान हा प्रगतशील देशांच्या विकासाचा पाया आहे. प्रयोगशाळांमध्ये केलेले प्रयोग हे समाजासाठी उपयुक्त आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांनी वैज्ञानिक दृष्टीकोन जोपासावा, असे प्रतिपादन विवेकांनद महाविद्यालयाचे पदार्थ विज्ञान व खगोलशास्त्र विभाग प्रमुख प्रा. डॉ. मिलिंद कारंजकर यांनी केले. (science day)
दै. 'पुढारी' प्रयोग सोशल फाऊंडेशनतर्फे राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त पंचगंगा घाट परिसरात विद्यार्थ्यांसाठी आयोजित नदी प्रदूषण पातळी मापन कार्यशाळेत ते बोलत होते.
यामध्ये विवेकानंद कॉलेज, न्यू कॉलेज, यशवंतराव चव्हाण कॉलेज (केएमसी) चे विद्यार्थी, शिक्षकांनी सहभाग घेतला. कारंजकर म्हणाले, भौतिक, रासायनिक व जैविक गुणधर्माची तपासणी केल्यानंतर प्रदूषण पातळी निश्चित करता येते. (science day)
यामधील भौतिक गुणधर्म तपासणी केल्यानंतर पंचगंगा नदीचे प्रदूषण होण्यास सुरुवात झाल्याचे दिसून आले. वाढत्या तापमानाबरोबर नदीमधील शेवाळ वाढून नदीपात्रातील पाणी हिरवे झाले आहे. प्रदूषण टाळण्यासाठी नदीतील गाळ काढण्याबरोबरच पाणी वाहते ठेवणे आवश्यक आहे.
यावेळी उपप्राचार्य टी. के.सरगर, प्रा. सचिन धुर्वे, प्रा. रवींद्र मांगले, प्रा. के. बी. कोळी यांच्यासह शिक्षक व परिसरातील नागरिक उपस्थित होते.