

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : कोल्हापूरला रोज हजारो पर्यटक भेट देत असतात. कोल्हापूर जिल्हा पर्यटन स्थळ म्हणून नावारुपास असताना शिवसेना नेते आणि राज्याचे पर्यटन व पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील पर्यटन वृद्धीसाठी ३१ कोटी ३१ लाख इतका निधी मंजूर केला आहे. मंत्री ठाकरे येत्या सोमवारी (दि.२१) कोल्हापूर दौऱ्यावर येत आहेत, अशी माहिती राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी दिली.
कोल्हापूर जिल्हा दौऱ्यात मंत्री आदित्य ठाकरे "कोल्हापूर जिल्हा माझी वसुंधरा अभियान" याविषय कोल्हापूर जिल्ह्यातील पर्यावरण व पर्यटन विकासा संदर्भात सोमवारी सकाळी ११.३० वाजता जिल्हाधिकारी कार्यालय, कोल्हापूर येथे बैठक होणार आहे.
कोल्हापूर जिल्ह्यास ऐतिहासिक स्थळांचा वारसा लाभला आहे. राजर्षी शाहू महाराजांच्या दूरदृष्टीने सुजलाम-सुफलाम असलेल्या जिल्ह्यात गेल्या अनेक वर्षांपासून पर्यटन क्षेत्राच्या दृष्टीने सुविधांचा वाणवा जाणवत होता. कोल्हापूरच्या श्री अंबाबाई मंदिरासह जिल्ह्यातील विविध धार्मिक क्षेत्रे, गडकिल्ले, तलाव, अभयारण्य आदींना दरवर्षी लाखो पर्यटक भेट देतात. या पर्यटकांना मुलभूत सोयी सुविधा देणे, पर्यटकांना आकर्षित करण्याकरिता नवनवीन संकल्पना राबविणे यासाठी पर्यटन मंत्री ठाकरे यांच्याकडे पाठपुरावा केला जात आहे.
याबाबत मंत्री ठाकरे यांनीही सकारात्मक भूमिका घेत पर्यटन विभागाच्या माध्यमातून प्रादेशिक पर्यटन विकास योजना सन २०२१-२२ अंतर्गत जिल्हास्तरावरील नवीन कामांना प्रशासकीय मान्यता देवून निधी उपलब्ध करून दिला आहे. यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यात विविध विकास कामांसाठी ३१ कोटी ३१ लाखांचा निधी मंजूर केला आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात कोल्हापूर जिल्ह्याच्या पर्यटन विकासासाठी निधी मंजूर झाल्याने आगामी काळात कोल्हापूर जिल्ह्याच्या पर्यटन विकासास चालना मिळणार आहे.