

दर्शन वडेर
नृसिंहवाडी : कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील आलास गावात एक अत्यंत दुर्मीळ व प्राचीन गणेशमूर्ती उजेडात आली आहे. १८०० वर्षांचा इतिहास असलेल्या या गावातील मगदूम गल्लीत १२०० वर्षे जुनी चालुक्यकालीन गणेशमूर्ती आणि नंदी आढळून आला आहे. यंदाच्या गणेशोत्सवात गावातील तरुणांनी या मूर्तीची स्वच्छता करून तिची विधिवत पूजा करत हा ऐतिहासिक ठेवा जगासमोर आणला आहे.
स्थानिक अभ्यासकांच्या माहितीनुसार, ही मूर्ती दाक्षिणात्य (द्राविड) शैलीतील असून ती बदामी-हंपीच्या चालुक्य घराण्याच्या काळात घडवली गेली आहे. ही मूर्ती चतुर्भुज असून डाव्या सोंडेची आहे. कालांतराने मूर्तीची मोठ्या प्रमाणावर झीज झाली आहे. विशेष म्हणजे, खिद्रापूरचे प्रसिद्ध कोपेश्वर मंदिर उभारण्यापूर्वी सुमारे २०० वर्षे आधी चालुक्यांनी आलास गावात अनेक मंदिरे उभारली होती. मात्र, कालांतराने या मंदिरांची पडझड झाली व त्यातील दगडांचा वापर करून घरे बांधली गेली. मूळ शिवमंदिरातील पिंड नष्ट झाल्यामुळेच आज या प्राचीन गणेशमूर्तीसमोर चक्क नंदी विराजमान असल्याचे वेगळे चित्र येथे पाहायला मिळते. या नंदीमुळे ग्रामस्थांमध्ये ही मूर्ती नरसिंह किंवा ब्रह्मदेवाची असल्याचा संभ्रम होता. मात्र ऐतिहासिक कागदपत्रांच्या आधारे ही गणेशाचीच मूर्ती असल्याचे स्पष्ट झाले.
आजवर धूळ आणि खडीच्या ढिगाऱ्यात असलेल्या या मूर्तीचे खरे महत्त्व समजल्यानंतर, मगदूम गल्लीतील तरुणांनी एकत्र येत गणेश चतुर्थीच्या काळात या परिसराची साफसफाई केली आणि गणरायाची आरती केली. यासोबतच गावातील मोरे गल्लीतही शिलाहार घराण्याच्या काळातील आणखी एक प्राचीन गणेशमूर्ती असल्याचे समोर आले आहे. गणेशोत्सवाच्या निमित्ताने आलास गावातील तरुणांनी आपल्या परिसरातील या दुर्लक्षित आणि प्राचीन वारशाचे महत्त्व ओळखून जे संवर्धन पाऊल उचलले आहे, त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
आलास गावासमोरच खिद्रापूरचे प्राचीन शिवमंदिर आहे. यामुळे चालुक्य राजघराण्याने आलास गावातही अनेक प्राचीन मंदिरे बांधली होती. कुरुंदवाड, मिरज येथील जुन्या नोंदीनुसार ही मूर्ती गणेशाची असल्याचे उजेडात आले. गावातील तरुणांच्या सहकार्याने या मूर्तीच्या संवर्धनासाठी प्रयत्न करणार आहोत.
प्रदीप मोरे, इतिहास अभ्यासक, आलास