Fetal gender diagnosis case | गर्भलिंग निदानप्रकरणी १ हजार २०० पानांचे दोषारोपपत्र दाखल

१२ जणांवर विविध कलमांद्वारे आरोप; निदानापासून गर्भपातापर्यंतची साखळीच उघड
Fetal gender diagnosis case |
Fetal gender diagnosis case | गर्भलिंग निदानप्रकरणी १ हजार २०० पानांचे दोषारोपपत्र दाखल
Published on: 
Updated on: 

आशिष आडिवरेकर

कोल्हापूर : गर्भलिंग निदानप्रकरणी कळंबा येथील थ्री स्टार लॉजिंगवर करवीर पोलिसांनी कारवाई केली होती. १२ जणांच्या टोळीने ४०७ गर्भपात केले असून निदानापासून गर्भपात आणि गर्भांची दवाखान्यातच लावलेली विल्हेवाट याची साखळीच तपासात समोर आली. याप्रकरणी १२०० पानांचे दोषारोपपत्र पोलिसांनी नुकतेच न्यायालयात दाखल केले. १२ जणांवर बेकायदेशीर गर्भलिंग निदान करणे, गर्भपात करणे, महाराष्ट्र वैद्यकीय अधिनियम या कलमांद्वारे आरोप ठेवले आहेत.

स्वप्निल पाटील म्होरक्या

बोगस डॉक्टर स्वप्निल पाटील हा गर्भलिंग निदान आणि गर्भपाताच्या रॅकेटचा म्होरक्या होता. संतोष कोळी, दयानंद संकपाळ, किरण चव्हाण, आश्विनी शिंदे, मनीषा कांबळे, नंदकुमार पाटील हे स्वप्निलचे एजंट होते. तपासणीसाठी पेशंट घेऊन आल्यास त्यांना ३ ते ४ हजारांचे कमिशन मिळत होते. यानंतर गर्भपातासाठी शब्बीर हजारेमार्फत डॉ. चंद्रकांत गायकवाडसोबत संपर्क केला जात होता. गर्भपातासाठी २५ ते ३० हजार रुपये घेतले जात होते.

डॉ. गायकवाडचीही यंत्रणा; ४०७ गर्भपात

स्वप्निल पाटीलकडे तपासणी केलेले पेशंट डॉ. गायकवाडकडे येत होते. अन्य काही ठिकाणी तपासणी केलेले पेशंटही डॉ. गायकवाडकडे गर्भपातासाठी आल्याची माहिती दोषारोपपत्रात समोर आली. सागर तराळ, रेखा वरुटे, शब्बीर हजारे हे गायकवाडसाठी काम करत होते. डॉ. चंद्रकांत गायवाडने शाहूपुरी येथील तीन मेडिकल दुकानांतून ४०७ गर्भपाताची किट खरेदी केली होती. त्याने याचा वापर करून गर्भपात केल्याची कबुलीही दिली आहे. याबाबत त्याचा मदतनीस शब्बीरने धक्कादायक खुलासे केले असून काही गर्भांची विल्हेवाट दवाखान्यातच लावल्याचे समोर आले आहे.

याप्रकरणी १२०० पानांचे दोषारोपपत्र न्यायालयात सादर केले आहे. यामध्ये १२ जणांना अटक झाली आहे. या सर्वांची साखळी योग्य पुराव्यांद्वारे न्यायालयात सादर केली आहे.

रवींद्र कळमकर, पोलिस निरीक्षक, करवीर पोलिस ठाणे

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.