

कोल्हापूर : दहावीचा निकाल जाहीर होऊन दीड महिना उलटून गेला. पण अजूनही अकरावीचे वर्ग सुरू झालेले नाहीत. प्रवेश प्रक्रिया संथगतीने सुरू असून विद्यार्थी व पालक मोठ्या संभ्रमात असून त्यांची घालमेल सुरू आहे. शिक्षण विभागाच्या ढिसाळ नियोजनामुळे हजारो विद्यार्थी कनिष्ठ महाविद्यालय सुरू होण्याच्या प्रतीक्षेत आहेत.
शैक्षणिक वर्ष 2025-26 मध्ये अकरावीची प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने राज्यभर एकाच पद्धतीने सुरू आहे. कोल्हापूर जिल्ह्यात कला, वाणिज्य आणि विज्ञान शाखेसाठी जिल्ह्यातील 285 कनिष्ठ महाविद्यालयांतील 66 हजार 10 जागांसाठी प्रवेशप्रक्रिया सुरू आहे. व्यवस्थापन, इन हाऊस कोट्यामधील प्रवेश पूर्ण झाले आहेत. आतापर्यंत प्रवेशाची पहिली फेरी पूर्ण झाली असून यात सुमारे 16 हजारांहून अधिक विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केला आहे. प्रवेशाची दुसरी फेरी सुरू असून त्याची गुणवत्ता यादी 17 जुलै रोजी प्रसिद्ध होणार आहे. त्यानंतर 18 ते 21 जुलै दरम्यान प्रवेश निश्चिती चालणार आहे. यानंतर प्रवेशाच्या दोन फेर्या अद्याप बाकी आहेत.
शाळा-महाविद्यालये सज्ज असली तरी शासकीय यंत्रणा गोंधळलेली आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असून, त्यांचा अकरावीचा अभ्यासक्रम रखडणार आहे. अभ्यासक्रम कसा पूर्ण करायचा, वेळेचे नियोजन कसे करायचे याबाबत अजूनही निर्णय नाही. त्यामुळे शिक्षण यंत्रणा व विद्यार्थ्यांचे भवितव्य अधांतरी अवस्थेत आहे. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये नाराजी वाढत असून वेळेत वर्ग न सुरू झाल्यास शैक्षणिक नुकसान होण्याची शक्यता आहे. शिक्षण विभागाने तत्काळ योग्य पावले उचलून वर्ग सुरू करावेत, अशी मागणी पालक व शिक्षक वर्गातून होत आहे.
अकरावीचे वर्ग 11 ऑगस्टपूर्वी सुरू करण्याची मुभा शाळा व्यवस्थापनास प्राथमिक व माध्यमिक शिक्षण संचालनालयाने दिली आहे. याबाबतचे परिपत्रक संचालक डॉ. महेश पालकर यांनी काढले आहे. अकरावी प्रवेश एकूण प्रवेश क्षमतेपेक्षा 50 टक्के पूर्ण होणे गरजेचे असल्याचे यात म्हटले आहे. प्रत्यक्षात दरवर्षी 10 जुलै रोजी अकरावीचे वर्ग सुरू होतात. मात्र यंदा एक महिना उशिराने वर्ग सुरू होणार असल्याने विद्यार्थ्यांच्या अडचणी वाढणार आहेत.