

कोल्हापूर : माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयाच्या वतीने शैक्षणिक वर्ष 2026-27 ची इयत्ता अकरावीच्या केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेला शुक्रवार (दि.10) पासून सुरुवात होणार आहे. प्रवेश प्रक्रियेत विद्यार्थ्यांना अर्ज भाग-1 नोंदणी करता येणार आहे.
गेल्या वर्षी अकरावी प्रवेश प्रक्रियेतील अनियमितता व गोंधळामुळे अनेक विद्यार्थ्यांना अडचणींचा सामना करावा लागला. यंदा दहावीच्या निकालापूर्वीच शिक्षण संचालनालयाने अकरावीची प्रवेश प्रक्रिया सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री यांच्या ‘इज ऑफ लिव्हिग’ या कार्यक्रमांतर्गत अकरावीची केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया संपूर्ण राज्यात राबविण्यात येणार आहे.
10 एप्रिलपासून अर्ज भाग-1 विद्यार्थ्यांना भरता येणार आहे. प्रवेश प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी विद्यार्थ्यांना शिक्षण विभागाच्या संकेतस्थळ/पोर्टलवर ऑनलाईन नोंदणी करावी लागणार आहे. त्याठिकाणी महाविद्यालये शोधणे, उपलब्ध शाखा, माध्यम, प्रवेश क्षमता, रिक्त जागा तपासणे त्याप्रमाणे अर्ज करण्याची सुविधा ऑनलाईन उपलब्ध करुन देण्यात आली आहे.
ऑनलाईन प्रवेश टप्पे...
विद्यार्थ्यांनी ऑनलाईन पोर्टलवर नोंदणी करणे प्रवेश अर्ज भाग-1 भरणे व प्रमाणित करून घेणे अर्ज भाग-2 मध्ये विद्यालय निवडून पसंतीक्रम भरणे, प्रवेश फेरीत सहभागी होणे प्रवेश फेरीतील महाविद्यालय तपासणे, प्रत्यक्ष प्रवेश कार्यवाही करणे प्रवेशासाठी महाविद्यालय न मिळाल्यास पुढील फेरीसाठी अर्ज भरणे ‘एटीकेटी’ सुविधा प्राप्त विद्यार्थ्यांना पुरवणी परीक्षा निकालानंतर संधी.