

कोल्हापूर : अकरावी केंद्रीय प्रवेश प्रक्रियेसाठी ‘ओपन टू ऑल’ फेरीची मुदत सोमवारी संपली. आतापर्यंत जिल्ह्यात 44 हजार 108 विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केला आहे. यामध्ये विज्ञान (24 हजार 90), कला शाखा (11 हजार 731), वाणिज्यच्या (8 हजार 287) विद्यार्थ्यांचा समावेश आहे. अकरावीसाठी प्रवेशाची सहावी फेरी लवकरच घेण्यात येणार आहे.
यावर्षी पहिल्यांदाच अकरावी राज्यस्तरावर केंद्रीय पद्धतीने प्रवेश प्रक्रिया राबविली जात आहे. गेल्या दोन महिन्यांपासून अकरावीसाठीची प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. जिल्ह्यातील 280 कनिष्ठ महाविद्यालयांत 66 हजार 10 प्रवेश क्षमता आहे. कला, वाणिज्य, विज्ञान शाखेसाठी पहिल्या फेरीसाठी 41 हजार 899 विद्यार्थ्यांनी अर्ज भरले होते. अकरावीची प्रवेश प्रक्रिया सुरुवातीपासूनच गोंधळात सुरू झाली.
दोनवेळा प्रवेश नोंदणीची तारीख पुढे ढकलावी लागली. नोंदणी सुरू झाल्यानंतर सर्व्हर डाऊनमुळे असंख्य विद्यार्थी अर्ज भरू शकले नाहीत. प्रवेशाच्या तारखा वारंवार बदलल्याने विद्यार्थ्यांसह पालकांना नाहक त्रास सहन करावा लागला. त्यातच 50 टक्के जागा भरल्याशिवाय कॉलेज सुरू करू नका, असे शिक्षण विभागाने निर्देश दिल्याने बहुतांश कनिष्ठ महाविद्यालये बंद होती. परंतु, ओपन टू ऑल फेरीत काही जागा पूर्ण क्षमतेने भरल्याने कॉलेज सुरू झाली आहेत. अकरावी प्रवेशाची पुढील फेरी होणार असल्याचे शिक्षण विभागातील अधिकार्यांनी सांगितले. सहावी विशेष फेरी 14 ऑगस्टपासून सुरू होऊन ती 20 ऑगस्टपर्यंत चालेल.