पन्हाळा : वाघवे पैकी खोतवाडीत गव्यांचा कळप; नागरिकांत भितीचे वातावरण | पुढारी

पन्हाळा : वाघवे पैकी खोतवाडीत गव्यांचा कळप; नागरिकांत भितीचे वातावरण

वाघवे ; पुढारी वृत्तसेवा : पन्हाळा तालुक्यातील वाघवेच्या डोंगराळ भागात खोतवाडी – चव्हाणवाडी- उदाळवाडी परिसरात गेल्या चार दिवसांपासून जवळपास २५ गव्यांच्या कळपानं धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. तर या परिसरात दिवसाही गव्यांचा वावर वाढला आहे. गव्यांच्या भितीने शेतकरी रानात जाण्यास टाळाटाळ करत असून, शेतीची कामे खोळंबली आहेत. तसेच आता ऊस पिकासह इतर पिकांना पाणी आवश्यक असून शेतकरी मात्र पिकांना पाणी देण्यासाठी शेताकडे जात नसल्याचे दिसून येत आहे. मोठ्या प्रमाणात शेतीचे नुकसान होत. त्यामुळे वनविभागाने तातडीने याकडे लक्ष देवून गव्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी शेतकरी वर्गातून जोर धरत आहे.

गेल्या काही दिवसांपासून कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात गव्यांचा वावर पहावयास मिळत आहे. शिये गावात तर गव्यांच्या हल्ल्यात एका तरुणाचा मृत्यू झाला होता. तर अनेक ठिकाणी शेतकरी जखमी झाले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये अगोदररच भिती निर्माण झाली आहे. तर वाघवेच्या चव्हाणवाडी – खोतवाडी – उदाळवाडी या परिसरात गव्यांचा सतत वावर असतो. दरम्यान या परिसरात गेल्या चार दिवसांपासून जवळपास २५ गव्यांनी पिकांची नासधूस सुरू केली आहे. तर पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणात गव्यांच्या कळपानं ठाण मांडल्याने नागरिक भितीच्या छायेत आहेत.

सध्या या परिसरात गवत कापनीसह ऊस पिकांची कामे मोठ्या प्रमाणात सुरू असून, गव्यांच्या वावरामुळे शेतकरी शेताकडे जाण्यास टाळाटाळ करत आहेत. यामुळे शेतीच्या कामांवर परिणाम होत आहे. तर काही शेतकरी जीव मुठीत घेवून शेताकडे जात आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आर्थिक नुकसानीसह मोठी दुर्घटना होण्यापूर्वी वनविभागाने तातडीने याबाबत उपाययोजना राबवून कार्यवाही करावी अशी मागणी शेतकरी आणि नागरिकांमधून होत आहे.

वाघवेच्या वाड्यावस्ती परिसरात गव्यांचा वावर वाढला असून, यामुळे शेतीचे मोठे नुकसान होत आहे. त्यामुळे ग्रामपंचायत मार्फत उपाययोजना करण्यासाठीचा प्रस्ताव तयार केला आहे. वनविभागास तो सादर करण्यात येणार आहे.

सरपंच प्रदीप पाटील

वाघवे परिसरासह वाड्यांच्या डोंगराळ भागात गव्यांचा वावर वाढला असून, त्याबाबत उपाययोजना राबविण्याबात कार्यवाही सुरू आहे. त्यासाठी चर मारणे पर्याय असून ग्रामपंचायतीकडून प्रस्ताव मागितला आहे. तर नुकसानीचे पंचनामे सुरू आहेत. तसेच नागरिकांनी ही एकटे या परिसरात फिरु नये. खबरदारी घेवून शेताकडे जावे असे आवाहन वनविभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

वनरक्षक प्रतिभा पाटील

Back to top button