Green Corridor : पुणे-बंगळूर ग्रीन कॉरिडोर कोल्हापूरला जोडला जाईल | पुढारी

Green Corridor : पुणे-बंगळूर ग्रीन कॉरिडोर कोल्हापूरला जोडला जाईल

मुंबई ; पुढारी वृत्तसेवा : पुणे-बंगळूर ग्रीन कॉरिडोरमध्ये कोल्हापूरवर अन्याय होऊ देणार नाही, तो कोल्हापूरला जोडला जाईल, अशी ग्वाही केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी दिली. कोल्हापूरला लॉजिस्टिक पार्क स्थापन करण्याचा प्रस्ताव पाठवा, असे आवाहनही त्यांनी केले. (Green Corridor)

महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स व इंडस्ट्रीजच्या वतीने आयोजित पदग्रहण व अर्थसंकल्पावर चर्चा कार्यक्रमात गडकरी बोलत होते. यावेळी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड उपस्थित होते.

वाहतुकीचा खर्च कमी करण्यासाठी नव्या तंत्राचा वापर केला पाहिजे. त्यासाठी ग्रीन कॉरिडोरची आखणी केली आहे. कोणावरही अन्याय होणार नाही. कोल्हापूरवर तर नाहीच नाही, असेही गडकरी म्हणाले.

Green Corridor : देशात महाराष्ट्र राज्याची अर्थव्यवस्था सर्वात अधिक गतीने

जगात भारत व देशात महाराष्ट्र राज्याची अर्थव्यवस्था सर्वात अधिक गतीने वाढत आहे. निर्यात वाढवून आयात कमी करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत. महाराष्ट्र राज्याच्या विकासासाठी व व्यापार, उद्योग, कृषी क्षेत्राचा विकास करण्यासाठी वाहतुकीवर होणारा खर्च कमी करणे आवश्यक आहे.

महाराष्ट्र चेंबरने राज्याच्या विकासासाठी महत्त्वाचे योगदान दिले आहे. येणारा काळ इलेक्ट्रिक वाहनांचा असेल. इथेनॉलचा वापर मोठ्या प्रमाणात होणार असून, शेतकर्‍यांना त्याचा फायदा होईल. महाराष्ट्र चेंबरने राज्याचा जिल्हावार अभ्यास करून महाराष्ट्राच्या विकासाची ब्ल्यू प्रिंट तयार करून द्यावी, असे आवाहन करून गडकरी यांनी महाराष्ट्र चेंबरचे अध्यक्ष ललित गांधी व त्यांच्या सहकार्‍यांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन केले.

25 वर्षांचा काळ हा अमृत काळ

केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड यांनी, आगामी 25 वर्षांचा काळ हा अमृत काळ असेल. त्यादृष्टीने सरकारने काम सुरू केले आहे. देशात 75 डिजिटल बँका सुरू करण्यात येत आहेत. डिजिटल करन्सी आल्यावर पारदर्शकता येईल. भ्रष्टाचार संपुष्टात येईल. राज्याच्या व्यापार, उद्योग, कृषी क्षेत्राच्या विकासासाठी एकत्र येऊन काम करू, असे सांगितले.

महाराष्ट्र चेंबरचे अध्यक्ष ललित गांधी यांनी, चेंबरच्या महोत्सवी वर्षापर्यंतच्या महाराष्ट्राच्या सहा विभागांसाठी सहा महिला उद्योजिका क्लस्टर, कृषिपूरक उद्योगांचे क्लस्टर व उत्पादन आधारित उत्पादनांचे सहा क्लस्टर चेंबरच्या पुढाकाराने उभारण्यात येणार असल्याचे सांगितले.

चेंबरतर्फे सभासद व सहयोगी सभासद संस्थांच्या सभासदांना व्यापार विकासासाठी वेबसाईट व डिजिटल प्लॅटफॉर्म मोफत उपलब्ध करून देणार आहे. तसेच चेंबरतर्फे उत्पादक ते विक्रेता अशा व्यापार वृद्धीसाठी व सभासदांच्या व्यापार वृद्धीसाठी लवकरच अ‍ॅप उपलब्ध करून देणार असल्याची माहितीही देण्यात आली. आमदार प्रकाश आवाडे, राज के. पुरोहित यांचीही भाषणे झाली.

याप्रसंगी नूतन पदाधिकारी, कार्यकारिणी सदस्यांचा सत्कार करण्यात आला. वरिष्ठ उपाध्यक्ष उमेश दाशरथी यांनी प्रास्ताविक केले. उपाध्यक्ष रवींद्र माणगावे यांनी सूत्रसंचालन केले. उपाध्यक्ष करुणाकर शेट्टी यांनी आभार मानले. कार्यक्रमास विश्वस्त मंडळाचे चेअरमन आशिष पेडणेकर, संतोष मंडलेचा, खुशालचंद्र पोद्दार, शंतनू भडकमकर, सागर नागरे, विनी दत्ता, आदी उपस्थित होते.

Back to top button