

निगवे खालसा : वडकशिवाले (ता. करवीर) येथे गुरुवारी दुपारी दीडच्या सुमारास उसाला आग लागून अंदाजे 110 एकरांतील सुमारे 3000 टन ऊस जळून खाक झाला. यात 200 शेतकर्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. आग शॉर्टसर्किटने लागली की, अन्य कशाने याचे कारण समजू शकले नाही.
याबाबतची माहिती अशी, बाचणीकडे जाणार्या मुख्य रस्त्याला लागून असणार्या स्मशानभूमीपासून पुढे उसाला आगीने वार्याच्या वेगामुळे रौद्ररूप धारण केले. धुराचे लोट आकाशाला भिडले होते. शेतकरी व ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. उसाचा पट्टा तोडून आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. बिद्री व कागल येथील अग्निशमन दलाच्या दोन गाड्यांनी सर्व आग आटोक्यात आणली.
घटनास्थळी बिद्री कारखान्याचे चेअरमन के. पी. पाटील, संचालक प्रा. संभाजी पाटील, संचालक आर. एस. कांबळे, कार्यकारी संचालक, शेती अधिकारी बी. एन. पाटील, सहायक शेती अधिकारी दीपक पाटील, शेती पर्यवेक्षक संकेत वारके, शेती मदतनीस रवी चौगले यांनी भेट दिली. के. पी. पाटील यांनी निगवे, वडकशिवाले, बाचणी येथील वाहने या ठिकाणी पाठवून उसाला ताबडतोब तोडी लावून जळीत ऊस नेण्याची कार्यवाही करावी, असे आदेश दिले. ग्रामपंचायत प्रशासन, तलाठी, पोलिस पाटील यांनीही घटनास्थळी भेट दिली.
नुकसानभरपाईची मागणी
जळालेल्या उसाचे शेतकरी कारखाना सभासद असतील व उसाची नोंद असेल तर टनाला तीनशे रुपये कापून घेतलेे जातात. जो सभासद नाही त्याचे टनाला चारशे रुपये कपात केली जाते. त्यामुळे शेतकर्यांचे लाखो रुपयांचे नुकसान होणार आहे. शेतकर्यांना शासनाने नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी शेतकर्यांतून होत आहे.