

कोल्हापूर : डिजिटल अरेस्टची भीती घालून सम्राटनगर येथील निवृत्त प्राध्यापिका आणि देवकर पाणंद येथील निवृत्त अभियंत्याला 11 कोटींचा गंडा घालणार्या पुण्यासह धाराशिव येथील 5 सायबर चोरट्यांना राजारामपुरी पोलिसांनी अटक केली. सायबर भामट्यांच्या रॅकेटमधील मुंबई, नाशिक व नागपूर येथील काही संशयितांची नावे निष्पन्न होत आहेत.
बंडू हरिबा राठोड (वय 37, रा. यशवंतनगर, अंबेठाणरोड चाकण, पुणे, मूळ गाव तुगाव, ता. उमरगा, जि. धाराशिव), तेजस राहुल भालेराव (21, रा. खोरवडे, ता. दौंड), विवेक ऊर्फ विकी भास्कर गवळी (28, रा. शिवमल्हार हौसिंग सोसायटी, तळवडे निगडी, जि. पुणे), अक्षय रमेश कामठे (30, रा. शिव तारादत्त हौसिंग सोसायटी सासवड, ता. पुरंदर, पुणे), क्षितिज चंद्रकांत सुतार (24, रा. गणेश गार्डन अपार्टमेंट, वडगाव बुद्रुक, पुणे) अशी संशयितांची नावे आहेत.
संशयितांच्या बँक खात्यांवरील 48 लाख रुपये गोठविण्यात आले. संशयित क्षितिज सुतार हा टोळीचा प्रमुख सूत्रधार असल्याचेही सांगण्यात आले. सुतार हा ऑनलाईन फसवणुकीचे नेटवर्क नियंत्रित करत होता. संशयितांनी पुण्यासह अन्य ठिकाणच्या हॉटेलमधील खोलीत न्यायालय आणि पोलिस अधिकार्यांच्या कार्यालयाचा सेटअप तयार केला होता, अशीही माहिती चौकशीतून पुढे आली आहे. फसवणुकीतील रक्कम बंडू राठोडच्या खात्यावर जमा करण्यात येत होती. त्यानंतर संबंधित रक्कम पुढे अन्य खात्यांवर वर्ग करण्यात येत होती, अशी माहिती चौकशीतून पुढे येत आहे.
मुंबई, पुणे व नागपूर सायबर क्राईम सेलच्या वरिष्ठ अधिकार्यांनी राजारामपुरी व जुना राजवाडा पोलिस ठाण्यातील तपासाधिकार्यांची भेट घेऊन संशयितांच्या कारनाम्यांची माहिती घेतली आहे.