

एकनाथ नाईक
कोल्हापूर : कालपर्यंत सायरन वाजवत जीव वाचवण्यासाठी रस्त्यावर धावणारा ‘108’ रुग्णवाहिकेचा चालक आज स्वतःच मृत्यूशी झुंज देत अंथरुणावर पडला आहे. रुग्णांना वेळेत उपचार मिळावेत म्हणून रात्रंदिवस सेवा बजावणार्या महेंद्र कुडाळकर यांच्या आयुष्यावर आज दुर्मीळ आजाराने घाला घातला आहे. त्यांच्या पत्नी व दोन लेकरांचे अश्रू सीपीआरसमोर मदतीसाठी ओघळताना पाहून अनेकांचे काळीज हेलावले.
सडोली खालसा ( ता. करवीर) येथील महेंद्र महादेव कुडाळकर 2014 पासून सीपीआर रुग्णालयातील ‘108’ रुग्णवाहिकेवर चालक म्हणून सेवा बजावत आहेत. अपघात, प्रसूती, गंभीर रुग्ण अशा असंख्य प्रसंगात त्यांनी वेळेशी स्पर्धा करत अनेकांचे प्राण वाचवले. मात्र, सप्टेंबर 2025 मध्ये ड्युटीवर असतानाच ते अचानक बेशुद्ध पडले. वैद्यकीय तपासणीत त्यांना ‘मोटो न्यूरॉन’ सारखा दुर्मीळ व गंभीर आजार झाल्याचे निदान झाले. मेंदू व मणक्यातील मज्जारज्जूच्या पेशींवर परिणाम करणार्या या आजारामुळे गेल्या आठ महिन्यांपासून कुडाळकर अंथरुणाला खिळून आहेत.
घरातील कर्ता पुरुष अंथरूणाला खिळल्याने संपूर्ण कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे. पत्नी मदतीसाठी धवपळ करत आहे, तर दोन निष्पाप मुलांच्या डोळ्यांत बाबा बरे होतील ना? हा प्रश्न कायम दाटलेला आहे. गुरुवारी सीपीआरसमोर कुटुंबीयांनी हात जोडून 108 रुग्णवाहिका प्रशासनाला मदतीची विनंती केली. त्या वेळी उपस्थितांच्या डोळ्यांतही पाणी तरळले. गेली बारा वर्षे आरोग्य सेवेसाठी स्वतःचे आयुष्य कुडाळकर यांनी झोकून दिले. आज त्यांच्यावर मदतीसाठी हात पसरण्याची वेळ आली आहे. त्यामुळे रुग्णवाहिका चालकांमध्ये तीव— संताप व्यक्त होत आहे.
हातापायांची हालचाल मंदावत चालली आहे. बोलतानाही त्रास होतो. ज्यांच्या हातांनी हजारो रुग्णांना वेळेत दवाखान्यात पोहोचवले, तेच हात आज स्वतःच्या उपचारांसाठी हतबल झाले आहेत. पत्नी बाजारात भाजी विक्री करून उदरनिर्वाहाचा खर्च भागवून राहिल ती पुंजी भविष्यासाठी राखून ठेवत संसारगाडा चालवित होती; पण पतीच्या आजाराचा खर्च भागवताना तिला घरातील दागिनेही विकावे लागले. उपचारानंतरही आजारातून पती बरा होईल याची खात्री नसताही ती पतीच्या उपचारासाठी दिवसा भाजीपाल्याचा व्यवसाय करून रात्री पतीची सेवा करत आहे.