

आजरा : येथील भारत फायनान्स इन्क्ल्युजन लि. कंपनीच्या शाखेत चार कर्मचाऱ्यांनी १० लाख ६२ हजार ४५ रुपयांचा अपहार केल्याचे उघडकीस आले आहे. कर्जदारांच्या रकमेवरच डल्ला मारल्याने कर्जदारांमध्ये खळबळ उडाली आहे. याप्रकरणी आजरा पोलिसांत गुन्हा दाखल झाला असून दोघांना अटक करण्यात आली आहे.
साहिल संजय लोखंडे (वय २२, रा कोळिंद्रे, ता. आजरा) व पंकज संजय तेलशिंगे (२८, रा गणपती मंदिरजवळ, कुपवाड एमआयडीसी परिसर, सांगली) या दोघांना अटक करण्यात आली आहे. प्रथमेश विजय कुंभार (२६, रा. माया निवास, संत गोरा कुंभार वसाहत, कोल्हापूर), ज्ञानेश्वर जगन्नाथ पवार (२५, रा. खरसोळी, पोस्ट फूलचिंचोली, ता. व जि. सोलापूर) हे बेपत्ता आहेत. याबाबत तत्कालीन व्यवस्थापक विष्णुदास माधवराव पांचाळ (३१, रा. चेरा, ता. जळकोट, जि. लातूर, सध्या रा. धनगरवाडी, जुनी एमआयडीसी, सातारा) यांनी फिर्याद दिली आहे.
याबाबत पोलिसांतून मिळालेली माहिती अशी : येथील रवळनाथ काॅलनीत अनेक वर्षांपासून भारत फायनान्स इन्क्ल्युजन लि. कंपनीची शाखा आहे. शाखेत एकूण चौघे जण कामाला आहेत, तर एकूण ४७ सभासद आहेत. यातील साहिल, पंकज व प्रथमेश, ज्ञानेश्वर यांनी शाखेत कर्जदारांचे १० लाख ६२ हजार ४५ रुपये इतके कर्ज वसूल केले; मात्र ही रक्कम शाखेत जमा न करता चौघांनी मिळून हडप केली. अधिक तपास सहायक पोलिस निरीक्षक बाबासाहेब सरवदे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.