

कोल्हापूर : गांजाची तस्करी करून शहरात विक्री करणाऱ्या दोघांना स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने अटक केली. १० किलो गांजासह दुचाकी व तीन मोबाईल असा सुमारे ६ लाख ६० हजारांचा मुद्देमाल जप्त केला. राज गणेश पारखे (वय २२, रा. शिरोली पुलाची, ता. हातकणंगले), राम मारुती सावंत (वय २१, रा. यादववाडी, शिरोली पुलाची) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. सोमवारी सकाळी उचगाव येथील माळवाडी परिसरात कारवाई केली.
पुण्यातून गांजाची तस्करी करून दोघेजण कोल्हापुरात विक्री करणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलिस अंमलदार वैभव पाटील यांना मिळाली. त्यानुसार पोलिस निरीक्षक सुशांत चव्हाण यांनी पथक तयार करून माळवाडी परिसरात सापळा रचला असता, दोघे तरुण मोपेडवरून संशयितरीत्या फिरताना आढळले. त्यांना ताब्यात घेऊन अंगझडती घेतली असता, त्यांच्याकडे १० किलो गांजा आढळला. पोलिसांनी या दोघांसह दुचाकी, तीन मोबाईल ताब्यात घेऊन गांधीनगर पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलिस निरीक्षक चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस अंमलदार वैभव पाटील, महेंद्र कोरवी, सत्यजित तानुगडे, संतोष बरगे, संदीप सावंत, सागर चौगले यांनी ही कारवाई केली.
पुण्यातून तस्करी... कोल्हापुरात विक्री
राम सावंत, राज पारखे यांनी चार ते पाच दिवसांपूर्वी पुणे येथून २५ हजार रुपये किलो दराने गांजा खरेदी केला होता. याची विक्री कोल्हापूर शहरातील विविध पेडलरना ५० हजार रुपये किलोने करणार होते. राम सावंत याला २०२५ मध्ये शिरोली पोलिस ठाण्याच्या हद्दीत शस्त्र तस्करीप्रकरणी पोलिसांनी अटक केली होती.