

कोल्हापूर : भाजप पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम आटोपून कोल्हापूरकडे परतणार्या टेंपो ट्रॅव्हल्सचा मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर पनवेल बोगद्याजवळ अपघात होऊन दहा जण जखमी झाले. जखमींना तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी जखमींशी संपर्क साधून त्यांना वैद्यकीय मदतीसाठी प्रयत्न केले. सर्व जखमींची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले.
माजी नगरसेवक दिलीप पोवार, सरस्वती पोवार, उत्तम कोराणे यांनी नुकताच मुंबईत भाजपमध्ये प्रवेश केला. या कार्यक्रमासाठी पोवार व कोराणे यांचे समर्थक मुंबईला रवाना झाले होते. कार्यक्रम आटोपून कोल्हापूरकडे परतताना ही घटना घडली. जखमींमध्ये लियाकत नालबंद, अमजद पठाण, परशुराम हेगडे, किरण पोटभरे, उमर मुल्ला, मेहबूब सय्यद, शिवाजी शिंदे, गुंडा कोळी, रमेश चागुले, विकास माळवी जखमी झाले. उपचारानंतर सर्वांना डिस्चार्ज देण्यात आल्याचे दिलीप पोवार यांनी सांगितले.