CPR hospital | हिमोफिलिया रुग्णांसाठी ‘सीपीआर’ला कोटीचा निधी

CPR hospital Kolhapur |
CPR hospital | हिमोफिलिया रुग्णांसाठी ‘सीपीआर’ला कोटीचा निधी(File photo)
Published on
Updated on

कोल्हापूर : रक्त गोठण्याच्या प्रक्रियेत बिघाड झाल्याने आयुष्यभर रक्तस्रावाचा धोका असलेल्या हिमोफिलिया रुग्णांसाठी ‘हेमलिब्रा’ इंजेक्शनच्या खरेदीसाठी सीपीआर रुग्णालयाला जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून एक कोटी रुपयांचा तातडीचा विशेष निधी पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी मंजूर केला आहे. या निर्णयामुळे कोल्हापूरसह पाच जिल्ह्यांतील सुमारे ५५० रुग्णांना लाभ होणार आहे.

हिमोफिलियामध्ये किरकोळ दुखापतीपासून अंतर्गत रक्तस्रावापर्यंत गंभीर धोका निर्माण होऊ शकतो. विशेषतः, बालरुग्णांमध्ये वारंवार होणाऱ्या रक्तस्रावामुळे सांध्यांचे कायमस्वरूपी नुकसान होण्याची शक्यता असते. त्यामुळे रक्तस्राव झाल्यानंतर उपचार करण्याबरोबरच प्रतिबंधात्मक उपचार सातत्याने मिळणे आवश्यक आहे. ‘हेमलिब्रा’च्या नियमित वापरामुळे रक्तस्रावाच्या घटना कमी करण्यास मदत होते.

सीपीआरमध्ये सप्टेंबर २०२५ पासून पाच जिल्ह्यांतील रुग्णांना या उपचाराचा लाभ मिळत आहे. लहान मुलांपासून प्रौढांपर्यंतच्या ५५० रुग्णांसाठी औषधांचा नियमित साठा उपलब्ध हवा. यापूर्वी जिल्हा नियोजनमधून औषध खरेदी, यंत्रसामग्री व बांधकामासाठी १५ कोटींचा निधी मंजूर झाला होता. तो निधी खर्च झाल्यानंतर आता हा निधी मंजूर झाला आहे.

आवश्यकता भासल्यास अतिरिक्त निधी देऊ : पालकमंत्री

या उपचारासाठी दरवर्षी सुमारे अडीच ते तीन कोटी रुपयांच्या औषधांची आवश्यकता असते. त्यामुळे भविष्यातही निधीची कमतरता भासू नये, यासाठी दीर्घकालीन आर्थिक नियोजनाची गरज आहे. आवश्यकता भासल्यास पुढील काळात अतिरिक्त निधी उपलब्ध करून देण्याची ग्वाही पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिली आहे. आर्थिक अडचणीमुळे एकाही रुग्णाचा प्रतिबंधात्मक उपचार थांबू नये, यासाठी हा निधी महत्त्वाचा ठरणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news