

कसबा बावडा; पुढारी वृत्तसेवा : गणेशोत्सव जोशात आणि मोठ्या उत्साहात साजरा करा, पण कायदा आणि सुव्यवस्था कायम राहील याचीही खबरदारी घ्या, असे आवाहन शाहूपुरी पोलीस ठाण्याचे निरीक्षक राजेश गवळी यांनी केले. सार्वजनिक गणेशोत्सव 2022 च्या अनुषंगाने पोलिस ठाणे हद्दीतील कसबा बावडा व लाईन बाजारमधील मंडळाच्या कार्यकर्त्यांची तसेच पदाधिकार्यांच्या बैठकीत ते बोलत होते.
गवळी म्हणाले, राज्यात कसबा बावडा हे एकमेव ठिकाण आहे की, ज्या ठिकाणी सजीव देखावे सादर केले जातात. प्रेरणादायी देखाव्यांना वेळेच्या बंधनाबाबत पोलिस प्रशासन सकारात्मक आहे. शक्य असेल तर मंडळांनी सुरक्षिततेच्या दृष्टीने सीसीटीव्ही बसविण्याची व्यवस्था करावी.
बैठकीत कोल्हापूर महानगरपालिका उपशहर अभियंता हर्षजित घाटगे, महावितरणचे अभियंता सूर्यवंशी यांनी मार्गदर्शन केले. उदय गायकवाड यांनी पर्यावरणपूरक गणेशउत्सवाबाबत मार्गदर्शन केले. सुनील जवाहिरे यांनी गणेशोत्सव साजरा करताना घ्यावयाची काळजी आणि नियमांचे वाचन केले. यावेळी मंडळाचे कार्यकर्ते तानाजी चव्हाण, आनंदा करपे, निरंजन पाटील, चेतन बिरंजे, आदींनी मंडळाच्या वतीने गणेशोत्सव साजरा करताना येणार्या अडचणी मांडल्या. बैठकीस श्रीराम सेवा संस्थेचे सभापती हिंदुराव ठोंबरे, सपोनि श्रीकांत इंगवले, प्रमोद चव्हाण, मेधा पाटील, एएसआय संदीप जाधव, साजिद गवंडी, सविता रायकर, सुरेश उलपे यांच्यासह मंडळाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.