पालघर; पुढारी वृत्तसेवा : कोकणला ७२० किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा लाभला असून मुंबईसह सात सागरी जिल्ह्यात ४५६ मासेमारी करणारी गावे आहेत. मासे उतरविण्याच्या १७३ केंद्रांतून ५ लाख मेट्रिक टन मत्स्य उत्पादन केले जाते. मात्र अत्याधुनिक बोटींवरील पर्ससीन जाळ्यांद्वारे मासेमारी करण्यात येऊ लागल्याने पारंपरिक मच्छीमारांच्या व्यवसायावर परिणाम होऊ लागला आहे.
पालघर जिल्ह्यातील मत्स्योत्पादनातील घट जवळपास २० हजार टनाच्या घरात पोहोचली आहे. पालघर समुद्रातील माशांचे उत्पादन घटले असून याचा फटका स्थानिक मच्छीमार व पारंपरिक मासेमारीवर अवलंबून असलेल्या व्यवसायांना बसलेला पहायला मिळतो. तौक्ते वादळ, निसर्ग वादळ, पर्ससीन नेट मासेमारी तसेच हवामान बदलामुळे येथील माशांचे प्रमाण घटले आहे. पालघर जिल्ह्याचे मत्स्योत्पादन गत वर्षात ६० हजार मे. टन पर्यंत झाले आहे. पारंपरिक मच्छीमारांचे जाळे ५० हजारांचे असते तर पर्ससीन व्यावसायिकांचे जाळे वीस ते तीस लाखांचे असते. त्यांच्याकडे असलेल्या फिश फाइंडर या यंत्राच्या आधारे दीड किलोमीटपर्यंतच्या जाळे पसरवून मासे उचलले जातात. शासनाने पर्ससीन नेटवर अंशत: बंदी आणली असली तरी पर्सेसीनव्यावसायिक राजरोस मासेमारी करीत आहेत.