सिंधुदुर्ग विमानतळाचा आज लोकार्पण सोहळा !

सिंधुदुर्ग विमानतळाचा आज लोकार्पण सोहळा !

कुडाळ ; पुढारी वृत्तसेवा :  चिपी-परुळे येथील सिंधुदुर्ग विमानतळाचा लोकार्पण सोहळा शनिवार, 9 ऑक्टोबर रोजी दुपारी 1 वाजता राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते व अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे. या सोहळ्यात केंद्रीय हवाई वाहतूकमंत्री ज्योतिरादित्य शिंदे हे मुंबईहून दूरद‍ृश्य प्रणालीद्वारे सहभागी होणार आहेत.

केंद्रीय मंत्री नारायण राणे, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, उद्योगमंत्री सुभाष देसाई, पालकमंत्री उदय सामंत, खा. विनायक राऊत, आ. दीपक केसरकर, आ. वैभव नाईक, आ. नितेश राणे, जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी, जिल्हा पोलिस अधीक्षक राजेंद्र दाभाडे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. आयआरबी, एमआयडीसी विभागाने उद्घाटनाची जय्यत तयारी केली आहे. उद्घाटनाच्या पार्श्‍वभूमीवर सिंधुदुर्ग विमानतळ व परिसरात कडेकोट पोलिस बंदोबस्त तैनात ठेवण्यात आला आहे. हा उद्घाटन सोहळा पाहण्यासाठी सिंधुदुर्गवासीयांची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे.

सिंधुदुर्ग विमानतळ प्रकल्पाच्या उद्घाटनाच्या पार्श्‍वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व केंद्रीय सूक्ष्म, लघू, मध्यम उद्योगमंत्री नारायण राणे
तब्बल चार वर्षानंतर एकाच व्यासपीठावर येत आहेत.त्यामुळे हे दोन्ही प्रमुख नेते मंडळी काय बोलतात? याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी या सोहळ्याच्या अगोदर एक दिवस शुक्रवारी मुंबईत पत्रकारांशी बोलताना शिवसेनेच्या नेत्यांवर कडाडून टीका केली आहे. आपण मुख्यमंत्र्यांच्या समोरच या विमानतळाला ज्यांनी विरोध केला त्यांची नावे जाहीर करणार आहोत असा इशारा दिला आहे. त्यामुळे या कार्यक्रमात नेमके कोणते चित्र असेल याबाबतची उत्सुकता ताणली गेली आहे.

कोरोना विषाणूच्या पार्श्‍वभूमीवर सिंधुदुर्ग विमानतळ प्रकल्पाचा उद्घाटन सोहळा केवळ निमंत्रितांसाठीच ठेवण्यात आला आहे. त्यामुळे जिल्हावासीयांमधून काहीसा नाराजीचा सूर असला तरी यु-ट्युब, फेसबुक लाईव्ह व टीव्ही चॅनलच्या माध्यमातून हा सोहळा पाहता येणार आहे. तरी जनतेने सहकार्य करावे असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

रविवारपासून प्रवासी वाहतूक होणार सुरू

चिपी- परूळे (ता.वेंगुर्ले) येथील सिंधुदुर्ग विमानतळाचे शनिवार 9 ऑक्टोबर रोजी उद्घाटन होत आहे. यावेळी विमानतळावर उतरणार्‍या अलायन्स एअरच्या 70 सीटच्या पहिल्या विमानातून निमंत्रित मंडळी येणार आहे. रविवारपासून प्रवासी वाहतूक सेवा सुरू होणार आहे. कोविडचे नियम पाळून या विमानतळाचा लोकार्पण सोहळा पार पडणार असून मर्यादित निमंत्रित व्यक्‍तींंच्या उपस्थितीत हा सोहळा असणार आहे. या सोहळ्याची जय्यत तयारी करण्यात आली आहे. शुक्रवारी पालकमंत्री ना. उदय सामंत, खा. विनायक राऊत यांनी विमानतळाला भेट देऊन नियोजनाचा आढावा घेतला. यावेळी आ. वैभव नाईक, जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी, जिल्हा पोलिस अधीक्षक राजेंद्र दाभाडे, आयआरबीचे मनोज चौधरी व एमआयडीसीचे अधिकारी उपस्थित होते.

सिंधुदुर्ग ते शिर्डी विमान सुरू करण्याबाबत चर्चा ः खा. राऊत

सिंधुदुर्ग विमानतळावरून विमान सेवेबरोबरच आठवड्यातून तीनवेळा सिंधुदुर्ग ते शिर्डी अशी विमान सेवा सुरू करण्यासंदर्भात आमचे प्रयत्न सुरू आहेत. एअरलाईन्स कंपनीशी चर्चा झाली आहे. याबाबतही लवकर चाचपणी करुन सिंधुदुर्ग ते शिर्डी अशी विमानसेवा सुरू करण्याचा आमचा मनोदय असल्याचे खा. विनायक राऊत यांनी सांगितले.

विमानतळावर कडक सुरक्षा

सिंधुदुर्ग विमानतळ उद्घाटन पार्श्‍वभूमीवर सिंधुदुर्गसह मुंबई, रायगड तसेच रत्नागिरी जिल्ह्यातील पोलिस यंत्रणेचा कडक बंदोबस्त विमानतळावर तैनात ठेवण्यात आला आहे. कोणत्याही प्रकारे अनुचित प्रकार घडू नये, याकडे प्रशासनचे लक्ष आहे. हा उद्घाटन सोहळ्याप्रसंगी ठराविक निमंत्रित उपस्थित असले तरी सर्व पक्षाचे कार्यकर्ते या परिसरात येण्याची शक्यता आहे आणि त्या कार्यकर्त्यांमध्ये कोणत्याही प्रकारे अनुचित प्रकार घडू नये याकडे पोलिस यंत्रणा लक्ष ठेवून आहे. त्यादृष्टीने हा पोलिस बंदोबस्त तैनात ठेवण्यात आला आहे.जिल्हा पोलिस अधीक्षक राजेंद्र दाभाडे शुक्रवारी दिवसभर या बंदोबस्ताकडे नजर ठेवून होते.

आघाडीच्या नेत्यांसह भाजप नेत्यांचा सन्मान करणार ः ना. सामंत

सिंधुदुर्ग विमानतळ सिंधुदुर्गवासीयांचे स्वप्न आहे. त्यामुळे या ठिकाणी आमचे श्रेय नाही तर जिल्हावासीयांचे खरे श्रेय आहे. या विमानतळाच्या उद्घाटन सोहळ्यासाठी येणार्‍या महाविकास आघाडीच्या नेत्यांसह भाजपाच्या नेत्यांचा आम्ही सन्मान करणार आहोत, अशी माहिती राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री ना. उदय सामंत यांनी चिपी येथे नियोजन आढावा बैठकी दरम्यान दिली.तसेच येणार्‍या सहा महिन्यात चिपी विमानतळावरून चिपी ते मुंबई, चिपी ते शिर्डी, चिपी ते पुणे अशी विमाने प्रवास करतील. एकूणच हवाई ट्रॅफिक या विमानतळावरून निश्‍चितच झालेले दिसून येईल, असा विश्‍वास व्यक्‍त केला.

केंद्रीय हवाई वाहतूकमंत्री शिंदे मुंबईहून करणार मार्गदर्शन

केंद्रीय हवाई वाहतूकमंत्री ज्योतिरादित्य शिंदे या उद्घाटन सोहळ्याला येत नाहीत, असे नाही. ते देशाचा कारभार पाहतात. त्यांनी या उद्घाटन सोहळ्यासाठी दीड तासाचा वेळ दिला आहे. ते मुंबईतून सर्वांना दूरद‍ृश्य प्रणालीद्वारे मार्गदर्शन करणार आहेत, असे पालकमंत्री उदय सामंत यांनी सांगितले.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news