रत्नागिरी : खेडवासियांना दिलासा! जगबुडी नदीचा पूर ओसरण्यास सुरुवात

रत्नागिरी : खेडवासियांना दिलासा! जगबुडी नदीचा पूर ओसरण्यास सुरुवात
Published on
Updated on

खेड; पुढारी वृत्तसेवा : कोकणातील मुसळधार पावसाने गुरुवारी (दि.२०) विश्रांती घेतली असून खेडमधील जगबुडी नदीला आलेला पूर ओसरला आहे. तालुक्यात अतिवृष्टीचा फटका शहरासह ग्रामीण भागाला देखील बसला आहे. परंतु पूर ओसरत असल्याची परिस्थिती आहे. त्यामुळे गेल्या बारा तासांपासून जनजीवन पूर्वपदावर येऊ लागले आहे. हवामान खात्यामार्फत पुन्हा अतिवृष्टी होण्याच्या इशाऱ्यामुळे गुरुवारी (दि. २०) रत्नागिरी जिल्ह्यात सर्व शाळांना सुट्टी देण्यात आली आहे. जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात सर्वाधिक १८९ मिलीमीटर पावसाची नोंद खेडमध्ये झाली आहे.

कोकणातील अतिवृष्टीचा फटका चिपळूण व खेड तालुक्यांना बसला असून बुधवारी (दि. १९) या दोन्ही शहरांमध्ये पूरपरिस्थिती निर्माण झाली होती. परंतु गुरुवारी पहाटे पासून पावसाचा जोर कमी झाल्याने पुराचे पाणी ओसरले आहे. त्यानंतर पूरग्रस्त भागात पालिका प्रशासनाने स्वच्छता मोहीम हाती घेतली असून व्यापाऱ्यांनी देखील दुकानातील चिखल गाळ काढण्याचे काम सुरू केले आहे. शहरातील सफा मशीद, पोत्रीक मोहल्ला, साठे मोहल्ला, तांबे मोहल्ला, वाणी पेठ, गांधी चौक, तीन बत्ती नाका परिसर, नीवाचा चौक,बाजारपेठ, मटण मार्केट या सर्व पूर बाधित क्षेत्राची सफाई पालिकेच्या १ ट्रॅक्टर, १अग्निशमन वाहन,१ पाणी टँकर, आणि खाजगी २ ट्रॅक्टर वापरून करण्यात येत आहे. आवश्यकता नुसार पलिकेचे १ आणि खाजगी २ जेसीबी उपलब्ध आहेत. पालिकेचे ३२ आणि कंत्राटी २८ असे एकूण ६० सफाई कर्मचारी, ६ अग्निशमन कर्मचारी यांची ६ पथकांमध्ये विभागणी करून त्यांचेद्वारे शहर सफाई चे काम वेगाने सुरू आहे.

तालुक्यात एकूण १६३२.७० मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. बुधवारी दि.१९ रोजी मुसळधार पावसामुळे खेड-दापोली, भोस्ते-अलसुरे, चिंचघर ते बहिरवली जाणारा रस्ता हे मार्ग संपर्क तुटलेले होते. परंतु पावसाचा जोर मध्य रात्री नंतर थोडा कमी झाल्याने पूर ओसरल्याने या भागात रहदारी पूर्ववत सुरू झाली आहे. त्याशिवाय तळवट खेड- तळवट जावळी, खेड-शिर्शी (देवणा पूल), शिव मोहल्ला ते शिव खुर्द (बौध्दवाडी क्र.१) या मार्गावर देखील रस्ते वाहतूक पूर्ववत सुरु झाली आहे. आंबवली बाऊलवाडी रस्त्यावर दरड हटवण्याचे काम सुरु आहे. शिरगाव (बागवाडी), शिरगाव (पिंपळवाडी), शिरगाव (फोंडवाडी), शिरगाव (धनगरवाडी), अलसुरे मोहल्ला या संपर्क तुटलेल्या गावात व वाडयांमध्ये पुन्हा संपर्क प्रस्थापित झाला आहे.

यावर्षी नैसर्गिक आपत्तींमुळे खेडमधील एकूण १०३ कुटुंबातील ३८० जणांना स्थलांतरीत व्हावे लागले आहे. दरडप्रवण पोसरे खुर्द (बौध्दवाडी), पोसरे (सडेवाडी), साखर (बामणवाडी), मुसाड, बिरमणी गावातील एकूण १४ कुटुंबातील ४७ जणांना स्थलांतरीत करण्यात आले आहे. तालुक्यात पुन्हा पूर परिस्थिती निर्माण होण्याची व दरड कोसळण्याची शक्यता लक्षात घेऊन. आपत्ती व्यवस्थापन विषयक कामांचे सनियंत्रण व सर्व संबंधित विभागांशी समन्वय साधण्यासाठी खेडसाठी नोडल अधिकारी म्हणून अपर जिल्हाधिकारी शुभांगी साठे यांची नियुक्ती जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत करण्यात आली आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news