

ओरोस : निवडणूक आयोगाने जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य पदांचे आरक्षण सोमवार 13 ऑक्टोबर रोजी काढण्यात येणार आहे. सिंधुदुर्ग जि. प.च्या 50 सदस्यांची आरक्षण सोडत सिंधुदुर्गनगरी येथे जिल्हाधिकारी कार्यालयात तर 8 पंचायत समितींच्या 100 सदस्यांचे आरक्षण त्या-त्या तालुक्यांच्या तहसील कार्यालयात काढण्यात येणार आहे.
सकाळी 11 वा. एकाच वेळी हा आरक्षण सोडत कार्यक्रम होणार आहे. ही आरक्षण सोडत जाहीर झाल्या नंतरच जि. प., पं. स. निवडणूक रणधुमाळीचे बिगुल वाजणार आहे. दरम्यान प्रत्येक गट व गणातील इच्छुकांची धडधड वाढली आहे.
तसेच वैभववाडी, देवगड, कणकवली, मालवण, कुडाळ, वेंगुर्ले, सावंतवाडी, दोडामार्ग या आठ पंचायत समिती सदस्य आरक्षण सोडत तेथील तहसील कार्यालयात काढण्यात येणार असून यासाठी संबधित तहसीलदारांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी स. 11 वा. विशेष सभांचे आयोजन करण्यात आले आहे. तशी अधिसूचना जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी काढली आहे.