

कुडाळ : सिंधुदुर्गातील कुडाळ आणि सावंतवाडी रेल्वे स्थानका दरम्यान असलेल्या झाराप रेल्वेस्थानकात यावर्षी गणेशोत्सवानिमित्त विशेष 12 रेल्वे गाड्यांना थांबा देण्यात आला आहे. या गाड्यांच्या सुमारे 174 फेर्या या रेल्वेस्थानकात थांबणार आहेत. त्यामुळे माणगाव खोर्यासह वेंगुर्ला, सावंतवाडी, कुडाळ तालुक्यातील चाकरमानी, गणेशभक्तांना याचा फायदा होणार आहे. गणेशोत्सव काळातील पहिली रेल्वे शुक्रवार 22 ऑगस्ट रोजी मुंबईहून सुटणार असून ती दुपारी 2 वा. झाराप रेल्वेस्थानकात पोचेल, अशी माहिती ठाकरे युवासेनेचे कुडाळ तालुकाप्रमुख योगेश धुरी यांनी दिली.
गणेशोत्सवात गणेशभक्तांची गैरसोय टाळण्यासाठी गाड्यांना रेल्वे स्थानकात थांबा देण्यात यावा, अशी मागणी माजी खा. विनायक राऊत, माजी आ. वैभव नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली सिंधुदुर्गचग सुपूत्र व ठाकरे शिवसेनेचे कल्याण उपजिल्हाप्रमुख विजय देसाई यांनी रेल्वेच्या महाव्यवस्थापकांकडे लेखी निवेदनाद्वारे केली होती. त्यांच्या या पाठपुराव्याला यश आले आहे. गणेशोत्सव कालावधीत झाराप रेल्वेस्थानकात 12 एक्स्प्रेसच्या 174 फेर्यांना थांबा देण्यात आला आहे. सध्या या रेल्वेस्थानकात फक्त सावंतवाडी - दिवा पॅसेंजर ही एकच गाडी थांबते. झाराप रेल्वेस्थानक कुडाळ आणि सावंतवाडी स्थानकांच्या दरम्यान असून सावंतवाडी, वेंगुर्ले आणि कुडाळ तालुक्यातील सुमारे 100 हून अधिक गावांना हे मध्यवर्ती स्थानक आहे.
गणेशोत्सव विशेष पहिली ट्रेन शुक्रवार 22 ऑगस्ट रोजी पहाटे मुंबईहून सुटणार आहे. दुपारी 2 वा. ती झाराप रेल्वेस्थानकात पोचेल. यासाठी चाकरमानी, गणेशभक्त व नागरिकांनी ठाकरे शिवसेनेचे आभार मानल्याचे श्री. धुरी यांनी सांगितले.
01151/52 सीएसएमटी - सावंतवाडी (रोज) एकूण 40 फेर्या (22 ऑगस्ट ते 10 सप्टेंबर), सीएसएमटी वरून मध्यरात्री 12.20 वा. गाडी सुटेल ती झारापला दुपारी 2 वा. पोचेल. 01103/04 सीएसएमटी- सावंतवाडी (रोज) एकूण 36 फेर्या (22 ऑगस्ट ते 9 सप्टेंबर ). सीएसएमटी वरुन दुपारी 3.30 वा. गाडी सुटेल ती झारापला पहाटे 4 वा.पोचेल. 01167/68 एलटीटी - सावंतवाडी (रोज) एकूण 36 फेर्या (22 ऑगस्ट ते 9 सप्टेंबर). एलटीटी वरून रात्री 9 वा. गाडी सुटेल ती झारापला स. 9.20 वा. पोचेल. 01171/72 एलटीटी- सावंतवाडी (रोज) एकूण 40 फेर्या (22 ऑगस्ट ते 9 सप्टेंबर), एलटीटी वरुन स. 8.20 वा. गाडी सुटेल ती झारापला रात्री 9 वा. पोचेल. 01129/30 एलटीटी- सावंतवाडी (दर मंगळवारी) एकूण 6 फेर्या (26 ऑगस्ट, 2 सप्टेंबर, 9 सप्टेंबर), एलटीटी वरुन स. 8.45 वा. गाडी सुटेल ती झारापला रात्री 10.20 वा. पोचेल.