‘येतंव’ रिक्षा अ‍ॅपचे आज कणकवलीत लोकार्पण

जिल्हा व्यापारी महासंघाचा उपक्रम; पर्यटक, प्रवाशांना मिळणार तत्काळ वाहतूक सेवा
Yetav rickshaw app launch
कणकवली ः पत्रकार परिषदेत उपस्थित प्रसाद पारकर, नितीन वाळके, दीपक बेलवलकर, राजन पारकर, अण्णा कोदे, महेश आमडोसकर. pudhari photo
Published on
Updated on

कणकवली ः सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघाच्या पुढाकाराने व तालुका व्यापारी संघाच्या समन्वयाने झॅप सोल्युशनस् प्रा. लि. यांच्या सहकार्याने ‘येतंव’ हे अ‍ॅप विकसित करण्यात आले आहे. हे अ‍ॅप रिक्षाचालक आणि प्रवाशांसाठी पूर्णतः मोफत असून, या माध्यमातून जिल्ह्यातील दळणवळण सुलभ करणे तसेच व्यापार व पर्यटनाला चालना देणे हा यामागचा उद्देश आहे.

या अ‍ॅपमुळे प्रवाशांना तत्काळ प्रवासी वाहतूक सुविधा उपलब्ध होणार आहे. या अ‍ॅपचे जिल्ह्यासाठी लोकार्पण रविवार 18 मे रोजी सकाळी 11 वा. पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते एचपीसीएल हॉल, कणकवली कॉलेज येथे होणार आहे.

याबाबतची माहिती सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघाचे अध्यक्ष प्रसाद पारकर व कार्यवाह नितीन वाळके यांनी दिली. कणकवली तालुका व्यापारी संघ अध्यक्ष दीपक बेलवलकर, उपाध्यक्ष राजन पारकर, राजेश राजाध्यक्ष, सिंधुदुर्ग जिल्हा रिक्षा चालक मालक संघटनेचे पदाधिकारी अण्णा कोदे, महेश आमडोसकर उपस्थित होते.

या अ‍ॅपच्या कार्यप्रणालीबाबत बोलताना नितीन वाळके म्हणाले, गेली 37 वर्षे व्यापारी महासंघ व्यापार्‍यांच्या उन्नतीबरोबरच सामाजिक बांधिलकी जोपासण्याचे काम करत आहेत. ग्राहकांना सेवा देताना त्यांना रिक्षा, चारचाकी प्रवासी गाडीची वाहतूक सेवाही तात्काळ मिळावी यासाठी ‘येतंव’ हे अ‍ॅप विकसित करण्यात आले आहे. रामनवमी दिवशी मालवण शहरात ट्रायल म्हणून हे अ‍ॅप सुरू करण्यात आले. त्यानंतर देवगडमध्येही कार्यवाही सुरू झाली. आता महासंघाच्या पुढाकाराने संपूर्ण जिल्ह्यात हे अ‍ॅप वापरले जाणार आहे.

5300 मोबाईलधारकांनी डाऊनलोड केले अ‍ॅप

या आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून स्थानिक व्यापारी, प्रवासी आणि वाहतूक व्यावसायिकांनाही त्याचा फायदा होणार आहे. गेल्या सव्वा महिन्यात 5300 मोबाईल धारकांनी हे अ‍ॅप डाऊनलोड केले असून 220 रिक्षाचालकांनी त्याची नोंदणी केली आहे. त्यापैकी 1914 रिक्षाचालकांना या अ‍ॅपवर कॉल करण्यात आले आहेत.

रिक्षा चालकांचा व्यवसाय वाढणार

प्रवाशांना सहज रिक्षा उपलब्ध झाल्याने पर्यटक व नागरिक यांचा रिक्षाचा वापर वाढून उत्पन्नही वाढणार आहे. लोकेशन बदलण्याची सुविधा अ‍ॅपमध्ये असल्याने परतीच्या मार्गावरही त्यांना भाडे मिळू शकणार आहे. जिल्हावासियांची सेवा म्हणून व्यापारी महासंघाचा हा प्रयत्न असून जास्तीत जास्त रिक्षाचालक व प्रवाशांनी या अ‍ॅपच्या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघाने केले आहे.

‘येतंव’ अ‍ॅप कसे वापराल

प्रवाशांनी हे अ‍ॅप डाऊनलोड केल्यानंतर या अ‍ॅपच्या माध्यमातून त्यांना जवळच्या दोन कि.मी. च्या परिसरातील रिक्षा किंवा चारचाकी गाडी हवी असल्यास त्याची उपलब्धता व संपर्क क्रमांक मिळू शकणार आहे. त्यामुळे प्रवाशी थेट त्या रिक्षाचालकाशी किंवा कारचालकाशी संपर्क साधू शकणार आहेत. यामध्ये भाडे ठरवण्याची पद्धत पूर्वीप्रमाणेच असून प्रवाशी व रिक्षाचालक परस्पर संवादाद्वारे किंवा व्हॉटसअ‍ॅप मॅसेजवरून भाडे निश्चित करू शकतात. त्यात हे अ‍ॅप कोणताही हस्तक्षेप करणार नाही. या अ‍ॅपमुळे सुरक्षेसाठी दोघांचेही मोबाईल नंबर परस्परांना मिळणार आहेत. स्मार्ट फोन नसलेल्या रिक्षाचालकांनी दुसर्‍या कोणत्याही फोनवरून महासंघाने दिलेल्या 9082408882 या क्रमांकावर व्हॉटसअ‍ॅपद्वारे नोंदणी करू शकतात.

ऱिक्षा चालकांनी असे वापरावे अ‍ॅप

रिक्षाचालकांना या अ‍ॅपचा वापर करताना त्यांचे लोकेशन प्रथम अ‍ॅपवर टाकावे लागणार आहे. त्यामुळे प्रवाशांना त्यांच्या सर्चवर त्यांचे नाव व मोबाईल नंबर दिसणार आहेत. या अ‍ॅपमुळे थेट प्रवाशी फोन किंवा व्हॉटसअ‍ॅपद्वारे संपर्क साधून रिक्षा घरी किंवा ते ज्याठिकाणी असतील त्याठिकाणी रिक्षा बोलवू शकतात. रेल्वे प्रवास करताना स्थानक जवळ आल्यावर थेट रिक्षाचालकांशी संपर्क साधता येणार आहे. त्यामुळे प्रवास अधिक सोयीस्कर होणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news